![]()
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा पाच टक्के परतावा देण्याच्या आमिषाने १२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आतापर्यंत आरोपीने ४५ गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचे निषन्न्न झाले असून, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत गणेश अनिल घोलप (रा. धनगर आळी, गुरुवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एकाविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बावधन परिसरात राहायला आहे. आरोपीशी घोलप यांची ओळख झाली होती. त्या वेळी आरोपीने ‘राजपूत वाईज इन्व्हेस्टमेंट ’नावाची कंपनी असून, संबंधित कंपनीला ‘सेबी’ची मान्यता असल्याची बतावणी केली होती. संबंधित कंपनीकडून शेअर बाजारात गुंतवणूक केली जाते. आरोपीने २०२२ ते २०२५ या कालावधीत घोलप यांच्यासह अन्य गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले. गुंतवणूक केल्यास दरमहा पाच टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्याने पैसे घेतले होते. घोलप यांच्यासह ४५ जणांकडून त्याने १२ कोटी रुपये घेतले. सुरुवातीला आरोपीने त्यांना परतावा दिला. परतावा मिळाल्याने गुंतवणुकदारांचा विश्वास बसला. आरोपीने परतावा देणे बंद केल्यानंतर गुंतवणुदकारांनी पोलिसांकडे तक्रार दिली. फसवणूक प्रकरणाची व्याप्ती विचारात घेऊन संबंधित गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून, पोलीस निरीक्षक मोहन खंदारे तपास करत आहेत.
Source link
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने 12 कोटींची फसवणूक:45 गुंतवणूकदारांना गंडा, आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार