![]()
राज्यात काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच भाजप नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी एक मोठा राजकीय दावा करून खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावेत, यासाठी काही नेते प्रयत्नशील असल्याचा आरोप त्यांनी केला. देशमुख यांनी नाव न घेता टीकास्त्र डागत म्हटले की, “बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना” अशा भूमिकेतून काही जण महाराष्ट्राच्या राजकारणात विलीनीकरणाचा मुद्दा पुढे आणत आहेत. या संपूर्ण चर्चेमागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना काँग्रेसमध्ये महत्त्वाची पदे मिळवून देण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. पवारांना विरोधी पक्षनेतेपद देण्याचा प्रयत्न? एका वृत्तवाहिनीशी बोलताना आशिष देशमुख म्हणाले की, काही राजकीय नेत्यांची इच्छा आहे की शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावा. त्यानंतर शरद पवार यांना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद देण्यात यावे, अशीही त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी सूचित केले. “राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद शरद पवारांना मिळावे, यासाठी दिल्ली दरबारी प्रयत्न सुरू आहेत,” असा दावा देशमुख यांनी केला. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. उद्धव ठाकरेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करण्याचा ‘फॉर्म्युला’? देशमुख यांनी यापुढे आणखी एक धक्कादायक दावा करत म्हटले की, राष्ट्रवादीनंतर उद्धव ठाकरे यांचा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन करण्याची योजना असू शकते. त्यांच्या मते, उद्धव ठाकरे यांचे खासदार आणि पक्ष संघटना काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद देण्याची चर्चा काही स्तरांवर सुरू असू शकते. “आधी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन करायची आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसमध्ये समावेश करायचा, अशी काहींची सुप्त इच्छा असू शकते,” असे देशमुख म्हणाले. विलीनीकरणाचा मुद्दा चर्चेत कसा आला? गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांमध्ये पुनर्रचनेच्या चर्चांना वेग आला आहे. काही राजकीय नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यातील भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आशिष देशमुख यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. मात्र, शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षांकडून या दाव्यांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. महाविकास आघाडीत नव्या चर्चांना उधाण देशमुख यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षांच्या भविष्यातील राजकीय रणनीतीबाबत पुन्हा एकदा तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी “आमच्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही” असे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे आशिष देशमुख यांचा दावा हा केवळ राजकीय आरोप आहे की त्यामागे काही ठोस हालचाली सुरू आहेत, याबाबत आगामी काळात चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या मात्र या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Source link
आशिष देशमुखांचा खळबळजनक दावा:शरद पवारांना राज्यसभेचे विरोधी पक्षनेते, उद्धव ठाकरेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद मिळवून देण्याचा डाव