Headlines

नापिकीच्या नैराश्यातून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या:वसमत तालुक्यातील दुर्दैवी घटना




वसमत तालुक्यातील माळवटा येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २९ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे माळवटा गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील माळवटा येथील संभाजी टोमके (३५) यांना सुमारे तीन एकर शेत आहे. या शेतावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. यावर्षी त्यांनी शेतात सोयाबीनचे पिक घेतले होते. मात्र मागील काही दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे सोयाबीन कोमेजून जाऊ लागले होते. त्यामुळे त्यांनी तुषार सिंचन पध्दतीने पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, मागील दोन ते तीन वर्षापासून होत असलेली नापिकी तसेच यावर्षी पावसाने दिलेल्या उपडीपीमुळे ते अस्वस्थ झाले होते. यावर्षी पाऊस नसल्याने पीक हाती येईल की नाही याची चिंता त्यांना लागली होती. सदर प्रकार ते कुटुंबाला बोलून दाखवत होते. मात्र पाऊस पडेल व यावर्षी चांगले पीक येईल असे त्यांचे कुटुंबिय समजूत घालत होते. मात्र नापिकीमुळे अस्वस्थ झालेल्या संभाजी यांनी नेहमी प्रमाणे शेतात तुषार सिंचन लावण्यासाठी जातो असे सांगून गेले होते. त्यानंतर त्यांनी शेतातीतल आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच त्यांचे कुटुंबिय व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना तातडीने वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. या प्रकरणी बेगाजी टोमके यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जमादार भुरके पुढील तपास करीत आहे. मृत संभाजी यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. या घटनेमुळे माळवटा गावावर शोककळा पसरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *