![]()
सिन्नर तालुक्यातील पंचाळे शिवारात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास ट्रक आणि जीपच्या अपघातात जीपच्या केबिनने पेट घेतल्याने नवदाम्पत्यासह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एक महिला जीपमधून बाहेर फेकली जाऊन गतप्राण झाली. यात 7 जण जखमी झाले. गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या पंचाळेतील आदिवासी कुटुंबांवर काळाने घाला घातला. गाव दीड किमीवर असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघातप्रकरणी ट्रकचालक अशोक काळे (रा. जुन्नर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचाळे येथील मोरे, गांगुर्डे आणि नवले या आदिवासी कुटुंबातील सदस्य शुक्रवारी रात्री तालुक्यातीलच पाथरेला नातेवाईकाकडे जागरण गोंधळासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर मध्यरात्री जीप (एमएच 15 जेसी 6333) मधून 12 जण पंचाळेकडे निघाले अता समोरून येणाऱ्या कोंबडी खाद्याच्या ट्रकने (एमएच 14 एमटी 3839 ) जीपला जोरदार धडक दिली. यात दोन्ही वाहने उलटली. जीपच्या केबिनने पेट घेतला. केबिनमधील तिघांना बाहेर पडण्याची संधीच न मिळाल्याने आगीत त्यांचा मृत्यू झाला. चालत्या गाडीतून उड्या मारल्याने जीपच्या मागील बाजूस बसलेल्यांचे प्राण वाचले. मात्र यात सात जण जखमी झाले. तर एक महिला डांबरी रस्त्यावर पडल्याने मयत झाली. अपघातातील जखमी सुनीता नवले, सचिन नवले, दिव्या नवले, समीक्षा गांगुर्डे, अदिती आहेर, आरती आहेर आणि दोन वर्षीय देवांश मोरे यांच्यावर नाशिकला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन बंब पोहोचेपर्यंत तिघांचा कोळसा अपघात घडल्याचे समजतात पंचाळे ग्रामस्थांनी धाव घेतली. वाहनांना आग लागलेली असल्याने मदतकार्यात अडथळे येत होते. माळेगाव एमआयडीसी व सिन्नर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबांना पाचारण करण्यात आले. बंब पोहोचेपर्यंत जीपच्या केबिनमधील तिघांचाही कोळसा झाला होता. जळालेले मृतदेह बाहेर काढताना मदत करणारे कार्यकर्ते देखील सुन्न झाले होते. सिन्नर येथील पाच खाजगी रुग्णवाहिकांतनू मृतदेह व जखमींना हलवण्यात आले. पोलिस निरीक्षक भरत जाधव, नाशकातील फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून दोन्ही वाहने एमआयडीसी पोलिस ठाण्यात हलवली. सामूहिक अंत्यसंस्कार शनिवारी सकाळी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर चारही मृतदेह चार रुग्णवाहिकांमधून पंचाळे येथे आणण्यात आले. दुपारी 12 वाजता हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत आणि शोकाकुल वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गावाच्या इतिहासात अशी दुर्दैवी वेळ पहिल्यांदाच आल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते. सुखी संसाराचे स्वप्न बेचिराख अपघातात जीपचालक किरण रवींद्र मोरे (23), शुभम गणेश नवले (21), रिंकू शुभम नवले (19) आणि मीराबाई विश्वनाथ गांगुर्डे (68) यांचा मृत्यू झाला. जीपच्या केबिनमध्ये शुभम व रिंकू हे नवदाम्पत्य बसले होते. महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. सुखी संसाराचे त्यांचे स्वप्न या अपघातात बेचिराख झाले. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतलेल्या दाम्पत्याच्या आयुष्याचा अखेर एकत्रच झाला. मीराबाई गांगुर्डे या शुभमच्या आजी होत्या. किरणही नात्यातलाच होता.
Source link
ट्रक-जीपचा अपघात; नवविवाहीत दाम्पत्यासह चाैघांचा मृत्यू:7 जखमी, गोंधळावरून परतताना सिन्नरच्या पंचाळे शिवारात घडला अपघात