![]()
अकोला डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला परिचारिका व डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून (ता.१०) राज्यव्यापी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यात आल्यानंतर शनिवारीही (ता.११) सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू ठेवले. महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला होता. रुग्णसेवेसाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या महिला परिचारिका आणि डॉक्टरांवर झालेला हल्ला हा अत्यंत गंभीर असल्याचे संघटनेने म्हटले आहे. संघटनेच्या निवेदनानुसार, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात घडलेली घटना केवळ संबंधित कर्मचाऱ्यांवरील हल्ला नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर झालेला आघात आहे. रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी सातत्याने सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील दोषींना तत्काळ अटक करून भारतीय न्याय संहितेनुसार कठोर शिक्षा करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करावी, प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करावी. कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांच्या घटनांवर त्वरित कारवाईसाठी यंत्रणा उभारावी, अशी मागणी केली. सर्वोपचार रुग्णालयात परिचारिकांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.
Source link
परिचारिकांचे ‘काळ्या फिती’ लावून आंदोलन:सुरक्षा व्यवस्था बळकट करावी, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम हवी