![]()
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पेपरफुटीमुळे आतापर्यंत २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला. कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. “पंतप्रधानांची अशी कोणती फाईल धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आहे की ज्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जात नाही?” असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसतर्फे आयोजित ‘छात्रों की गूंज’ अभियानांतर्गत ही पत्रकार परिषद पुण्यात झाली. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसच्या शहराध्यक्ष दीप्ती चौधरी, प्रशांत जगताप, अमिर शेख आदी मान्यवर उपस्थित होते. कन्हैया कुमार म्हणाले की, ‘नीट’ आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील सातत्यपूर्ण पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण असून परीक्षा पद्धतीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या त्रुटींवर बोट ठेवताना त्यांनी सरकारी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, वाढते खासगीकरण आणि महागडी ‘कोचिंग संस्कृती’ यांवर टीका केली. केंद्र सरकार या गंभीर प्रश्नांवर संवेदनशील नसल्याचेही ते म्हणाले. देशातील विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि परीक्षा व्यवस्थेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी काँग्रेस ‘छात्रों की गूंज’ अभियान राबवत आहे. येत्या काळात या मुद्द्यावरून देशातील विविध शहरांमध्ये तीव्र आंदोलने छेडण्यात येतील, असा इशाराही कन्हैया कुमार यांनी दिला.
Source link
'नीट' पेपरफुटी: कन्हैया कुमार यांचा केंद्र सरकारवर निशाणा:शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, पंतप्रधानांवर टाळाटाळचा आरोप