![]()
नागपूरच्या मानकापूर परिसरात ‘गे डेटिंग’ ॲपच्या माध्यमातून एका १८ वर्षीय तरुणाला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी तरुणाला रात्रभर नागपुरात फिरवून मारहाण केली, धमकावले आणि त्याच्याकडून १०,००० रुपये उकळले. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी पाच दरोडेखोरांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘पोलो’ नावाच्या गे डेटिंग ॲपचा वापर करून पीडित तरुणाशी संपर्क साधला. ॲपवर सतत मेसेज करून त्यांनी तरुणाला मानकापूर चौक परिसरात भेटायला बोलावले. कामावरून घरी परतत असताना तरुण तिथे पोहोचला असता, एका आरोपीने त्याच्याकडे लिफ्ट मागितली आणि त्याच्या दुचाकीवर बसला. थोड्याच अंतरावर पुढे गेल्यानंतर या आरोपीने आपल्या इतर चार साथीदारांना बोलावून घेतले. या पाचही जणांनी मिळून तरुणाला घेरले आणि जबरदस्तीने त्याच्या दुचाकीची चावी, एटीएम कार्ड आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला. इतकेच नव्हे, तर आरोपींनी तरुणाला त्याच्याच गाडीवर बसवून मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत मानकापूर चौक, गोरेवाडा चौक, भरतवाडा रोड रेल्वे ट्रॅक, आरबीआय चौक पेट्रोल पंप आणि राजनगर अशा विविध ठिकाणी फिरवले. या काळात त्यांनी तरुणाला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि गंभीर धमक्या दिल्या. भीतीच्या छायेखाली असलेल्या तरुणाला आरोपींनी त्याच्या परिचितांकडून खोटे कारण सांगून पैसे मागवण्यास भाग पाडले. पीडित तरुणाने आपल्या ओळखीच्या लोकांकडून बँक खात्यात एकूण १०,००० रुपये जमा करून घेतले. पैसे जमा होताच दरोडेखोरांनी एटीएममधून ती रक्कम काढून घेतली. यानंतर, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी तरुणाचा मोबाईल फोन दगडाने ठेचून तोडून टाकला. तसेच, पोलिसात तक्रार केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकीही दिली. तरुणाच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी परिसरातील ७० ते ८० सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त माहितीच्या आधारे गिट्टीखदान परिसरातील पाच आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद शेख जाकरी, कुणाल मांजरखेडे, शोएब अली, फरान खान आणि शिजान शेख यांचा समावेश आहे. त्यांना २५ जून २०२६ रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली. सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. बदनामीच्या भीतीने अशा गुन्ह्यांची तक्रार न केलेल्या इतर नागरिकांनीही मानकापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Source link
गे डेटिंग ॲपवरून तरुणाला बोलावले, नागपुरात लुटले:रात्रभर फिरवून लुटणाऱ्या 5 दरोडेखोरांना अटक