Headlines

गणेशोत्सवात दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश:पुणे पोलिसांनी 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 13 गुन्हे उघड केले




गणेशोत्सवाच्या गर्दीत भाविकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीचा फरासखाना पोलिसांनी पर्दाफाश केला. एका आरोपीला अटक करून १३९.७२० ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाइल, धारदार चाकू आणि लोखंडी कटर असा २१ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत सोनसाखळी व मंगळसूत्र चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. विजयपाल कवर सेन (वय ३४, रा. इस्लामपूर घसौली, जिल्हा शामली, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी रात्री सागर प्रकाश कोमटी आणि त्यांचे मित्र विक्रांत शिंदे हे बुधवार चौकातील बेलबाग चौकाजवळ गणेश विसर्जन मिरवणूक पाहत होते. त्यावेळी सहा जणांच्या टोळीने त्यांना घेरले. एका आरोपीने कोमटी यांच्या खिशातील मोबाइल काढला, तर इतरांनी त्यांना पकडून मारहाण केली. चाकूचा धाक दाखवत लोखंडी कटरच्या साहाय्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी तोडली. त्यानंतर सोनसाखळी आणि मोबाइल हिसकावून आरोपी पसार झाले. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलीस हवालदार गजानन सोनुने आणि पोलीस अंमलदार चेतन होळकर यांना गोपनीय बातमीदाराकडून संशयित टोळीची माहिती मिळाली. त्याआधारे विजयपाल याला ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे यांनी केलेल्या चौकशीत त्याने अन्य पाच साथीदारांसह गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलीस पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन तपास केला. या कारवाईत चोरीचे सोन्याचे दागिने, फिर्यादीचा मोबाइल आणि गुन्ह्यासाठी वापरलेली हत्यारे जप्त करण्यात आली. दाखल गुन्ह्यासह आणखी १२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. ही टोळी गर्दीच्या उत्सवांमध्ये, यात्रांमध्ये आणि मिरवणुकांमध्ये भाविकांना लक्ष्य करत होती. सावजाला सर्व बाजूंनी घेरून, गर्दीचा फायदा घेत कटरने दागिने तोडण्याची त्यांची पद्धत असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे आणि उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अनिल सुरवसे पुढील तपास करत आहेत. या मोहिमेत नितीन तेलंगे, इरफान मोमीन, अमोल आवाड, गजानन सोनुने आणि चेतन होळकर यांच्यासह फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *