![]()
सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत नांदेड जिल्ह्यात नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून 32 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत भेसळीचा संशय असलेली मिरची पूड, हळद पूड, धने पूड आणि मीठ असा एकूण 25 हजार 832 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत 29 लाख 17 हजार 172 रुपये आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीदरम्यान अन्नपदार्थांचे 53 नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तपासणीत आढळलेल्या त्रुटींबाबत 13 आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विना नोंदणी व्यवसाय करणाऱ्या एका आस्थापनाला व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. सुधारणा नोटीस बजावूनही त्रुटींची पूर्तता न करणाऱ्या एका आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच चार आस्थापनांविरुद्ध तडजोडीची प्रकरणे दाखल करून 21 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. माहूरगडावरही विशेष तपासणी माहूरगड येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबविली. यामध्ये 15 अन्न आस्थापनांची तपासणी करून 16 अन्न नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. संबंधित व्यावसायिकांना स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन सणासुदीच्या काळात ग्राहकांनी परवानाधारक विक्रेत्यांकडूनच अन्नपदार्थ खरेदी करावेत. पॅकबंद पदार्थ खरेदी करताना त्यांची मुदत तपासावी. मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ योग्य तापमानात व स्वच्छ ठिकाणी साठवावेत आणि त्यांचा वेळेत वापर करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.
Source link
नांदेडमध्ये 29.17 लाखांचा संशयित भेसळयुक्त अन्नसाठा जप्त:‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत 32 आस्थापनांची तपासणी