![]()
वेलवेट पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थेने एकाच वेळी ४४ लेखकांची ५० पुस्तके प्रकाशित करून जागतिक विक्रम नोंदवला आहे. या विक्रमाची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली असून, सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात रविवारी हा अनोखा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव असलेल्या गायिका मंजुश्री ओक, पत्रकार समीक्षक सौमित्र पोटे आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अशोक आदक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वेलवेट पब्लिकेशनच्या संस्थापक वर्षा विशाल ठुकरूल आणि सिंधू बागवेही मंचावर उपस्थित होत्या. अशोक आदक यांनी एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या विक्रमाची नोंद झाल्याची घोषणा केली आणि वेलवेट पब्लिकेशनला प्रशस्तीपत्रक प्रदान केले. प्रकाशित झालेल्या पुस्तकांमध्ये ९ ते ८० वयोगटातील लेखकांचा समावेश आहे. यात कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबरी, विनोदी कथासंग्रह, चारोळीसंग्रह आणि बालकथा संग्रहांचा समावेश आहे. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन यशलक्ष्मी आर्ट्सतर्फे पद्मनाभ ठकार यांनी केले. प्रास्ताविकात वर्षा ठुकरूल यांनी सांगितले की, वेलवेट पब्लिकेशन नवोदित लेखकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. ज्या लेखकांना स्वतःची पुस्तके प्रकाशित करणे शक्य होत नाही, त्यांची पुस्तके ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर प्रसिद्ध केली जातात. गेल्या दहा महिन्यांत संस्थेने ६५ पुस्तके प्रकाशित केली असून, या कार्यक्रमातील बहुतांश लेखकांचे हे पहिलेच पुस्तक आहे. विक्रमाची नोंद झाल्याची घोषणा करताना अशोक आदक म्हणाले की, साहित्यकृती निर्माण करताना वय आणि व्यवसायाचे बंधन नसते हे यातून प्रकर्षाने जाणवले. नवोदित लेखकांसाठी अशा प्रकारचा उपक्रम प्रेरणादायक आहे. रोहिणी निनावे यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक लेखक दडलेला असतो. स्त्रीचे आयुष्य एखाद्या कादंबरीसारखे असते, ज्यात अनेक प्रसंग आणि कथा-काव्य दडलेले असते. आपल्यातील कला ओळखून निर्माण झालेली पुस्तके कौतुकास्पद असून, यासाठी मिळालेला कुटुंबाचा पाठींबा मोलाचा आहे. वर्षा ठुकरूल यांनी हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले आहे. सौमित्र पोटे यांनी इतक्या मोठ्या संख्येने लेखक आणि त्यांच्या साहित्यकृतींचे प्रकाशन ही आशादायक बाब असल्याचे म्हटले. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींनी लिहिते होऊन व्यक्त होणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. साहित्यनिर्मिती करताना प्रमाणभाषेचा आग्रह न धरता बोलीभाषेतूनही उदंड साहित्यसंपदा निर्माण व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Source link
50 पुस्तके एकाच वेळी प्रकाशित, जागतिक विक्रम:एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद