Headlines

रेवतीच्या लग्नात जल्लोष होता, पण तुमच्या नसण्याने जान मिसिंग होती:अजित पवारांच्या निधनाला 5 महिने पूर्ण, रोहित पवारांची भावूक पोस्ट




राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज पाच महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या या अपघाताने संपूर्ण राज्याला आणि देशाला हादरवून सोडले होते. या घटनेला पाच महिने लोटल्याच्या निमित्ताने, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. “दादा, या महाराष्ट्राने तुमची आठवण काढली नाही, असा एकही दिवस गेला नाही,” अशा शब्दांत त्यांनी अजितदादांना आदरांजली वाहिली. रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये घरातील एका महत्त्वपूर्ण प्रसंगाची आठवण काढली. नुकत्याच पार पडलेल्या रेवतीच्या विवाहसोहळ्याचा उल्लेख करत ते म्हणाले, “लग्नात मोठा जल्लोष होता, पण मामा म्हणून तुमची अनुपस्थिती सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. जयच्या लग्नात तुम्ही उडवून दिलेली धम्माल आजही सर्वांच्या स्मरणात आहे. तोच रुबाब, तोच थाट आणि तीच धम्माल रेवतीच्या लग्नातही दिसली असती, तर आम्हा सर्वांना किती आनंद झाला असता.” रोहित पवार यांचे पत्र जशास तसे… प्रिय अजितदादा… त्या दुर्देवी घटनेला आज बघता बघता पाच महिने झाले. काळ कुणासाठी थांबत नाही, पण असा एकही दिवस गेला नाही, ज्या दिवशी तुमची आठवण या महाराष्ट्राने काढली नाही. नुकतंच रेवतीचं लग्न झालं… लग्नात सगळ्यांनीच तुम्हाला खूपsss मीस केलं.. मामा म्हणून तुमची अनुपस्थिती तर सर्वांनाच चटका लावणारी होती. लग्नात ‘जल्लोष’ होता पण तुमच्या नसण्याने ‘जान’ मिसिंग होती. जयच्या लग्नात तुम्ही केलेली धम्माल सर्वांना आठवली. तशीच धम्माल आणि तोच थाट, तोच रुबाब आम्हाला रेवतीच्या लग्नातही बघायला मिळाला असता तर किती भारी वाटलं असतं, किती आनंद झाला असता! तुम्ही असता तर बळीराजाच्या तोंडाला पाने पुसली नसती दादा, दुष्काळाव्या उंबरठ्‌यावर असलेल्या महाराष्ट्रातील अन्नदाता आज मोठ्या चिंतेत आहे. तुम्ही मातीतले ऑर्थ्यांनिक नेते होतात… मातीत राबणा-या हाताची आणि कष्टाची तुम्हाला जाणीव होती.. तुम्ही असतात तर या सरकारप्रमाणे फसवी कर्जमाफी केली नसती आणि अन्नदात्याच्या तोंडाला पानंही पुसली नसती. तुम्ही असता तर शेतक-यांना असं फसवलं गेलं नसतं आणि अन्नदात्यासाठी मलाही रस्त्यावर उतरावं लागलं नसतं. म्हणूनच तुमची उणीव आम्हा सर्वांना आणि शेतक-यांना प्रकर्षाने पदोपदी जाणवतेय. दादा, तुम्ही ‘शब्दाचा पक्का’ होतात.. पण हा ‘पक्का शब्दही’ आज हरवलाय. तुमच्या अपघाताच्या चौकशीचा तुमच्याच सरकारने भर सभागृहात दिलेला शब्दही आज पूर्ण होत नाहीय, हे रखेदानं बोलावं लागतंय. पण आम्ही मात्र लढत आहोत आणि शेवटपर्यंत लढत राहू, हा तुम्हाला माझा शब्द आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा बट्ट्याबोळ नुकत्याच सुरु झालेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ९७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आणि पुन्हा तुमची आठवण आली. तुम्ही असतात तर अवघ्या तीन महिन्यांत बजेटचा असा बट्ट्याबोळ नक्कीच झाला नसता. आज दरोज राज्यात जे काही चाललंय ते तर उघड्या डोळ्यांनी पहावंसंही वाटत नाही… ‘राजकारण लै वंगाळ असतं’ या तुमच्या वाक्याची तर सातत्याने सर्वांनाच जाणीव होतेय. म्हणूनच म्हणतो दादा…. तुम्ही असाल तिथून उठा आणि नेहमीच्या स्टाईलने झपझप पावले टाकत तडक पुन्हा आमच्यात या… प्रत्येक भाषणात तुम्ही ‘माझा महाराष्ट्र’ म्हणायचात ना.. मग या तुमच्या महाराष्ट्राच्या विकासाची गतीही तुमची वाट पाहताना थांबलीय. तिची पावलंही मंदावलीय… म्हणून म्हणतो अजितदादा ही गती वाढवण्यासाठी तरी परत या.. अजितदादा परत या.. MISS U दादा..!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *