![]()
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण आता कमालीचे तापले आहे. या परीक्षा घोटाळ्याचे तीव्र पडसाद आज मुंबईत उमटले. मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने थेट शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आ
.
मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज सकाळी अचानक मंत्रालय आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या शासकीय बंगल्यासमोर धाव घेतली. ७ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ पद सोडावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी स्वतः हातात “दादा भुसे राजीनामा द्या” असे मोठे पोस्टर्स फडकवून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्याच्या परिसरात ‘पेपरचोर गादी छोड’ अशा तीव्र शब्दांतील घोषणा लिहिल्या आणि सरकारचा निषेध केला.
आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
शिक्षणमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची मोठी धावपळ उडाली. आंदोलनाची वाढती तीव्रता आणि घोषणाबाजी पाहता, घटनास्थळी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांनी तात्काळ कडक पावले उचलली. पोलिसांनी आंदोलनाचा प्रयत्न हाणून पाडत मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना बळाचा वापर करून ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांना पोलीस गाडीत बसवून स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, त्यानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांचे एसआयटी गठित करण्याचे आदेश
दरम्यान, दरम्यान, या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असून, या संपूर्ण रॅकेटच्या मुळाशी जाण्यासाठी तात्काळ विशेष तपास पथक गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्याचे सहपोलिस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना फोन करून तपासाबाबत सक्त निर्देश दिले आहेत.
“या पेपरफुटीच्या गुन्ह्यात जे कोणी सामील असतील, मग ते कितीही मोठे असोत, त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करा. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाऊ नये,” असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या प्रवृत्तींचा तत्काळ बंदोबस्त करण्यासाठी एसआयटीला विशेष अधिकार देण्यात आल्याचे समजते.
1028 केंद्रांवर पुन्हा होणार परीक्षा
राज्यातील 37 शहरांतील 1028 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी सुमारे 6 लाख 1 हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे लाखो उमेदवारांवर या निर्णयाचा परिणाम झाला आहे.
आरोपी दिल्लीहून आले, 1.5 कोटींची होती मागणी, आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक
राज्यात 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता (TET) परीक्षेचा पेपरफुटीचा मोठा कट भिवंडी पोलिसांनी उधळून लावत तीन आरोपींना अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे कोनगाव पोलिसांनी सापळा रचून आरोपींकडून प्रश्नपत्रिकेचे चार संच जप्त केले. शिक्षण विभागाने पडताळणी केल्यानंतर हेच मूळ प्रश्नपत्रिका असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, आरोपींनी हा पेपर विकण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांच्या आगाऊ रकमेची मागणी केली होती. हे पेपर पुढे विविध उमेदवारांना विकण्याचा त्यांचा कट होता.
अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक आरोपी हरियाणाचा, तर दोघे बिहारचे असून ते दिल्लीहून प्रश्नपत्रिका घेऊन भिवंडीत आले होते. आरोपींकडून मोबाईल फोन, डेबिट-क्रेडिट कार्डसह अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून त्याचे नेतृत्व डीसीपी पवन बनसोड करणार आहेत. पेपर दिल्लीतून कसा बाहेर आला, शिक्षण विभागातील कोणाचा सहभाग आहे का आणि या रॅकेटचे आणखी धागेदोरे कोणते, याचा तपास सुरू आहे. विविध राज्यांमध्येही पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. येथे वाचा पोलिसांच्या पत्रकार परिषदेची सविस्तर बातमी