Headlines

मावळच्या पाटण गावात घरावर कोसळली दरड:संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे प्रवास पूर्णपणे ठप्प




पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आता दुर्घटनांचे सत्र सुरू झाले आहे. आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास मावळ तालुक्यातील पाटण गावात एका घरावर डोंगरकड्यावरून मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ढिगाऱ्याखाली संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब अडकल्याची प्राथमिक भीती व्यक्त केली जात असून, घटनास्थळी बचावकार्याला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासन तात्काळ अलर्ट मोडवर आले आहे. पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी (DDMO) दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार आणि स्थानिक महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मुसळधार पाऊस आणि चिखलाचे साम्राज्य यामुळे सुरुवातीला बचावकार्यात अडथळे येत होते, मात्र स्थानिकांच्या मदतीने प्रशासनाने तातडीने मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले आहे. एनडीआरएफचे ३० जवानांचे विशेष पथक दाखल मातीचा आणि दगडांचा मोठा ढिगारा असल्याने स्थानिक पातळीवरील मदत अपुरी पडत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पुणे येथील ५ व्या बटालियनला पाचारण करण्यात आले आहे. निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली एनडीआरएफचे ३० सदस्यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. यामध्ये १ वरिष्ठ अधिकारी, २ अधिकारी आणि २७ जवानांचा समावेश आहे. हे पथक अत्यावश्यक आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव साहित्यांसह आज पहाटे ५.५० वाजताच घटनास्थळाकडे रवाना झाले असून त्यांनी आता बचावकार्याची सूत्रे हाती घेतली आहेत. अद्याप जीवितहानीची नोंद नाही सध्या पाटण गावात अत्यंत तणावपूर्ण वातावरण असून, संपूर्ण यंत्रणा ढिगाऱ्याखालील नागरिकांचा शोध घेत आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अधिकृतरीत्या कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही. आत अडकलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लवकरात लवकर आणि सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष आता या बचाव मोहिमेकडे लागले आहे. अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे प्रवास पूर्णपणे ठप्प दुसरीकडे, मुसळधार पावसामुळे पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांना जोडणारी रस्ते आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने आणि पाणी साचल्याने महामार्ग आणि लोहमार्ग बंद करण्यात आले असून, नागरिकांनी अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. पावसाचा सर्वाधिक फटका मुंबई-पुणे प्रवासाला बसला आहे. नुकत्याच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या अत्याधुनिक ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरही दरड कोसळली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. द्रुतगती मार्गावर अमृतांजन पूल आणि खालापूर टोल नाक्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही दरड कोसळल्याने रस्ते वाहतुकीचे सर्व प्रमुख पर्याय बंद पडले आहेत. प्रशासनाकडून युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू आहे. मिसिंग लेन बंद, बोगदा संपल्या वर दरड कोसळली
नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला मिसिंग लेन हा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरील एका बोगद्यासमोर दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. रेल्वे वाहतुकीलाही मोठा फटका; १६ गाड्या रद्द रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचीही मोठी गैरसोय झाली आहे. लोणावळा आणि ठाकूरवाडी परिसरात पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळल्याने रेल्वेची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे मध्य रेल्वेने आतापर्यंत १६ एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या आहेत, तर ६ गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. मुंबई-पुणे मार्गावर बोगद्याजवळ दरड कोसळली मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील बोगदा क्रमांक 40 (BB EMD) येथे दरड कोसळली आहे. दरड हटविण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून, मार्ग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, काही गाड्या रद्द तसेच वळविण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील ‘हे’ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही मार्ग तात्पुरते बंद केले आहेत: मुंबई – पुणे एक्स्प्रेसवे मुंबई – पुणे जुना हायवे मुंबई – गोवा हायवे (चिपळूण खवटीजवळ) पेण – खोपोली मार्ग (रायगड) मुंबई – गोवा महामार्ग (सुकेळी खिंडीत, रायगड) माणगाव – पाली मार्ग (रायगड) माणगाव – पुणे ताम्हणी घाट मार्ग (रायगड)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *