Headlines

राष्ट्रउभारणीसाठी संवाद, समन्वय आवश्यक – नरेंद्र ठाकूर:पुणे येथे 'धर्माचार्य परिषद' संपन्न; पंचपरिवर्तनावरही झाले प्रबोधन




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रउभारणीसाठी संवाद आणि समन्वयाची गरज अधोरेखित केली. पुणे येथे आयोजित ‘धर्माचार्य परिषदे’त ते बोलत होते. यावेळी ह.भ.प. कैलास महाराज ढगे यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर प्रभावी प्रबोधन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘विद्यापीठ भाग’ आणि ‘धार्मिक श्रेणी संपर्क विभाग’ यांच्या वतीने पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ठाकूर यांनी संघाच्या १०० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजींचा संघाच्या स्थापनेमागील दृष्टिकोन आणि इंग्रजांविरुद्ध त्यांनी घेतलेली भूमिका स्पष्ट केली. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघाचे कार्य पोहोचणे आणि राष्ट्रउभारणीत संवाद व समन्वय वाढणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या परिषदेत ह.भ.प. कैलास महाराज ढगे यांनी ‘पंचपरिवर्तन’ या विषयावर मार्गदर्शन केले. स्वदेशी, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि नागरी कर्तव्य या पाच सूत्रांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. समाजपरिवर्तनासाठी केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता, प्रत्येकाने या पाच घटकांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. या परिषदेच्या यशस्वी आयोजनात विद्यापीठ भाग संघचालक सुभाष कदम आणि धार्मिक श्रेणी संपर्क प्रमुख दत्ता मारुती सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला विविध मठांचे धर्माचार्य, वारकरी संप्रदायातील मान्यवर, विविध मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आणि परिसरातील सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परस्परातील स्नेह आणि संवाद वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित या परिषदेची सांगता उत्साहात झाली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *