Headlines

देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान:मुसळधार पावसातही भक्तिमय वातावरण, नव्या चांदीच्या रथातून पादुकांचा सोहळा




जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आज देहूतून उत्साहात प्रारंभ होत आहे. मुसळधार पावसामुळे आणि इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासनाने काही निर्बंध लागू केले असले, तरी वारकऱ्यांचा उत्साह कायम असून संपूर्ण देहूनगरी “ज्ञानोबा-तुकोबा”च्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. पुढील 18 दिवसांचा पंढरपूरच्या दिशेने निघणारा हा भक्तिमय प्रवास आज सुरू होत आहे. संत तुकाराम महाराज मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीने नटले असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून यासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. मंदिराच्या बाह्य भागासह गाभाऱ्यातही विविध रंगांच्या फुलांची देखणी आरास करण्यात आली आहे. पहाटेपासून विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. पंचपदी पार पडली असून त्यानंतर काल्याचे कीर्तन आणि पादुका पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. पहिल्यांदाच नव्या चांदीच्या रथातून पालखी प्रस्थान यंदाच्या वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पादुका प्रथमच नव्याने तयार करण्यात आलेल्या चांदीच्या रथात विराजमान होणार आहेत. या नव्या रथाचे वजन जुन्या रथाच्या तुलनेत तब्बल 600 किलोने कमी करण्यात आले आहे. पादुका पूजनानंतर या रथातून पालखी सोहळा देहूतून मार्गस्थ होईल. आजच्या प्रस्थानानंतर पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होणार असून त्यानंतर पालखी पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. पुढील 18 दिवस वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने चालत राहणार आहेत. पूरामुळे निर्बंध; मंदिरात केवळ मानकरी आणि मोजक्या वारकऱ्यांनाच प्रवेश गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये म्हणून निर्बंध लागू केले आहेत. नेहमीप्रमाणे हजारो वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्याऐवजी यंदा केवळ मानकरी आणि मोजक्या वारकऱ्यांनाच मंदिरात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वारकऱ्यांना मंदिराबाहेरूनच पालखी प्रस्थान सोहळा पाहावा लागत आहे. देहूनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी देहूत दाखल झाले आहेत. “आनंदाचे डोही आनंद तरंग” म्हणत विठ्ठलभक्त भक्तिरसात तल्लीन झाले आहेत. “ज्ञानोबा-तुकोबा”च्या अखंड जयघोषाने देहूनगरी दुमदुमून गेली असून सर्वत्र विठ्ठलमय वातावरण अनुभवायला मिळत आहे. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठ्ठल भेटीची आस स्पष्ट दिसत आहे. मुसळधार पाऊस आणि पुराचा अडथळा असतानाही भक्तीचा उत्साह कमी झालेला नाही. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि वारीची परंपरा जपण्यासाठी हजारो वारकरी देहूत एकवटले आहेत. मान्यवरांची उपस्थिती पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील या सोहळ्यात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जिवंत प्रतीक संत तुकाराम महाराजांची पालखी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि वारकरी संप्रदायाच्या एकतेचा जिवंत वारसा मानली जाते. पिढ्यान्पिढ्या अखंड सुरू असलेली ही परंपरा आज पुन्हा एकदा नव्या उत्साहाने सुरू होत असून लाखो वारकरी “विठ्ठल… विठ्ठल…”चा गजर करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहेत. पालखी मार्गाची महत्त्वाची माहिती प्रस्थान: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून होते. यंदाच्या सोहळ्यात पहिल्यांदाच चांदीच्या नव्या रथाचा वापर करण्यात आला आहे. मार्ग आणि मुक्काम: देहूतून निघालेली पालखी आकुर्डी, पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, इंदापूर, बारामती, वाखरी मार्गे पंढरपूरला पोहोचते. सुरक्षा आणि वाहतूक: मुसळधार पावसामुळे देहू आणि आळंदी परिसरात ‘रेड अलर्ट’ असून, सुरक्षेसाठी इंद्रायणी नदीकाठ आणि गाथा मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *