![]()
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीच्या अचूक नियोजनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ‘हायटेक’ सुरक्षा यंत्रणा सज्ज केली आहे. डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने यंदाचा वारी सोहळा सुरक्षित व सुलभ करण्याचा संकल्प पुणे पोलीस प्रशासनाने केला आहे. पालखीचा अचूक मार्ग, प्रगती आणि वारकऱ्यांच्या गर्दीचा अंदाज घेण्यासाठी दोन्ही पालख्यांच्या रथांवर प्रत्येकी 4, तर मिरवणुकीच्या पुढे-मागे 8 अशी एकूण 12 जीपीएस उपकरणे बसवण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर 101 आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर 125 असे एकूण 226 सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास थेट नजर ठेवण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहेत. हे सर्व कॅमेरे ‘एकीकृत कमांड अँड कंट्रोल सेंटर’ शी जोडले गेले आहेत. सुरक्षेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. हरवलेल्या व्यक्ती, लहान मुले, वृद्ध तसेच संशयित गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी 28 ‘फेशियल रेकग्निशन सिस्टम’ कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गर्दीची घनता मोजणारे एआय प्रणालीयुक्त कॅमेरे गर्दीची मर्यादा ओलांडताच नियंत्रण कक्षाला तात्काळ सतर्क करतील. प्रवेश आणि बाहेर पडणाऱ्या मार्गांवर 8 प्रवेश आणि 4 निर्गमन कॅमेऱ्यांद्वारे वारकऱ्यांची अचूक मोजणी केली जाईल. प्रगत व्हिडिओ ॲनालिटिक्सच्या माध्यमातून संशयास्पद वस्तू, भांडणे, महिलांची सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीवर त्वरित कारवाई केली जाईल. हवेतून निगराणी ठेवण्यासाठी प्रगत ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे. जमिनीवर जलद हालचालींसाठी 5 मोठी आणि 19 मिनी ‘मोबाईल सर्व्हेलन्स वाहने’ तैनात करण्यात आली असून, ती फिरते नियंत्रण कक्ष म्हणून काम करतील. सुरक्षेची खात्री करण्यासाठी अनधिकृत ड्रोन पाडणारी ‘अँटी-ड्रोन सिस्टम’ देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. वारकऱ्यांना सूचना देण्यासाठी 500 महत्त्वाच्या ठिकाणी 100 हून अधिक लाऊडस्पीकर यंत्रणा बसवण्यात आली आहे. ऑन-ग्राउंड पोलिसांच्या समन्वयासाठी 300 वॉकी-टॉकी आणि 50 हून अधिक वायरलेस संच दिले आहेत. तसेच घातपात विरोधी सुरक्षा तपासणीसाठी विसावा आणि मुक्काम स्थळांवर 30 डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर आणि 50 हँडहेल्ड मेटल डिटेक्टर वापरले जात आहेत.
Source link
पुणे पोलिसांची आषाढी वारीसाठी 'हायटेक' सुरक्षा:ड्रोन, एआय, सीसीटीव्हीने लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची खात्री