Headlines

किल्ले प्रतापगडावर 367 मशालींचा ऐतिहासिक दीपोत्सव:शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग, भवानी माता मंदिराच्या 367 व्या वर्षपूर्तीनिमित्त गडावर भव्य सोहळा




छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी रात्री भक्ती, परंपरा आणि शिवप्रेमाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. प्रतापगडावरील श्री भवानी माता मंदिराच्या 367 व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित मशाल महोत्सवात तब्बल 367 मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींच्या केशरी प्रकाशाने संपूर्ण गड उजळून निघाला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो शिवभक्त आणि भाविकांनी प्रतापगडावर गर्दी केली होती. अश्विन शुद्ध षष्ठीच्या मुहूर्तावर भवानी मातेची विधिवत पूजा आणि पारंपरिक गोंधळाने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर ढोल-ताशांचा गजर, तुतारीचे निनाद आणि शिवभक्तांच्या जयघोषाने गडावरील वातावरण भारावून गेले. ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. खासदार उदयनराजे भोसले, कल्पनाराजे भोसले आणि दमयंतीराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करण्यात आले. भवानी माता मंदिरापासून गडावरील बुरुजापर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मशाली पेटविण्यात आल्या. रात्रीच्या अंधारात उजळलेला गड पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *