![]()
देशात विरोधकांनी तसेच कॉकरोच जनता पार्टीमधील तरुणांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. राजधानी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी तसेच एसआयआर रद्द करण्यासाठी कॉंग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, या आंदोलनाला ‘अराजकता’ म्हणत सरकारने विरोधकांवर पलटवार केला आहे. आता पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे. SIR ला विरोध तर फक्त निमित्त आहे, खरा विरोध लोकशाहीला आहे, असे म्हणत फडणवीसांनी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले की, लोकशाही मार्गाने पात्र मतदारांच्या मताच्या माध्यमातून निवडून येण्याची शक्यता दूरदूरपर्यंत दिसत नसल्याने त्यांच्या तोंडून ते ‘सत्य’ बाहेर आले. देशात अराजकता माजवून सत्ता मिळवण्याचा त्यांचा डाव अखेर उघड झाला आहे. त्यांना SIR का नकोय? कारण त्यांना ‘रेजीम’ बदलायचीय. निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर येण्याची शक्यता नसल्यामुळेच ‘रेजीम’ बदलण्याची भाषा ते करत आहेत. त्यांना सत्ता उलथून टाकायचीय, पण लोकशाही मार्गाने नव्हे. तसेच SIRला विरोध हे फक्त निमित्त. खरा विरोध आहे तो लोकशाहीला, खरा विरोध आहे तुमच्या आमच्या पात्र मतांना. आता आपल्याला ठरवायचंय, लोकशाही हवी की ‘रेजीम’ बदलण्याची भाषा करणारे? लोकशाहीसाठी SIR शिवाय पर्याय नाहीच, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. आंदोलन सुरू असताना पत्रकार परिषदेत वकील प्रशांत भूषण यांनी रेजीम चेंज असा शब्द वापरला होता. म्हणजेच, सत्ता उलथवून लावण्यासाठी हे आंदोलन सुरू असल्याचे प्रशांत भूषण यांनी म्हटले होते. या शब्दावरून सत्ताधाऱ्यांनी पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. आज देखील मुख्यमंत्र्यांनी त्याच शब्दाला घेत पुन्हा पलटवार केला आहे. नेमके काय म्हणाले होते प्रशांत भूषण? निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून सध्या सुरू असलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, जर सरकारला असे वाटत असेल की ही सत्ता परिवर्तनाची लढाई आहे, तर हो आम्हाला सत्ता परिवर्तन हवेच आहे. यात चुकीचे काय आहे? लोकशाहीत सरकार बदलण्याची मागणी करणे हा काही गुन्हा नाही. नागरिकांना लोकशाही मार्गांने सरकार बदलण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे, असे विधान त्यांनी केले होते.
Source link
'SIR' ला विरोध हे केवळ निमित्त, खरा विरोध लोकशाहीला:CM देवेंद्र फडणवीस म्हणाले- अराजकता माजवून सत्ता मिळवण्याचा डाव