“राज्यातील शेतकरी आज तीव्र दुष्काळाच्या संकटात होरपळत आहे. पावसाअभावी केळी आणि उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ आली असून जनावरांना प्यायला पाणी व चारा उरलेला नाही. अशा विदारक परिस्थितीत जनतेच्या दुःखावर फुंकर घालण्याऐवजी भाजपचे नेते नवरात्रोत्
.
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना अतुल लोंढे यांनी भाजपच्या गरबा महोत्सवांमधील उधळपट्टीचा संपूर्ण ताळेबंद मांडला, तसेच महिला सुरक्षेबाबत राष्ट्रसेविका समितीच्या भूमिकेवर आणि तिरंगा फडकवणाऱ्या आंदोलकांवरील पोलिसी कारवाईवर सडकून टीका केली.
एका दिवसाचा खर्च 1 ते 1.5 कोटी; 2,000 टनचा एसी अन् रोज 25 लाखांचे भाडे!
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीतील ‘नमो रमो जमझट’ गरबा महोत्सवाच्या खर्चाचा पाढा वाचताना अतुल लोंढे म्हणाले, डोंबिवलीच्या संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात 7,000 चौरस फुटांचा इनडोअर आणि 20,000 चौरस फुटांचा आउटडोअर प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. मंडपात तब्बल 2,000 टन क्षमतेची एसी यंत्रणा बसवण्यात आली असून तिचे दररोजचे भाडेच 7 लाख रुपये आहे.
लाईट्स, साऊंड आणि जनरेटर
4 ते 5 तासांच्या गरब्यासाठी साऊंड व एलईडी रोषणाईवर दररोज 25 लाख रुपये उधळले जात आहेत. वीजपुरवठ्यासाठी लावलेल्या 25 जनरेटर सेट्सचे रोजचे भाडे 7.5 लाख रुपये आहे, तर फुलांच्या आराशीवर दररोज 3 ते 5 लाख रुपये खर्च होत आहेत. गुजरातमधून बोलावलेला प्रसिद्ध गायक निलेश गढवी एका कार्यक्रमाचे 1 ते 2 कोटी रुपये मानधन घेतो, तर इतर स्थानिक गायक 2 ते 5 लाख रुपये रोज घेत आहेत. सिम्फनी बँडसह गायकांवर रोज 4 ते 5 कोटींचा खर्च होत आहे.
100 कोटींचा चुराडा
केवळ डोंबिवलीतच नव्हे, तर कांदिवली पूर्वमध्ये अतुल भातखळकर, सांताक्रूझमध्ये मंत्री आशिष शेलार, तसेच आमदार संजय उपाध्याय, विनोद शेलार आणि माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी आयोजित केलेल्या अशा भव्य सोहळ्यांवर संपूर्ण नवरात्रीत 100 कोटी रुपयांहून अधिक खर्च केला जात आहे. 10 ते 12 दिवसांत तब्बल 1.5 लाखांहून अधिक गर्दी जमवून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा पैशांचा बाजार मांडला गेला आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याऐवजी भाजप नेते विधान परिषदेच्या प्रचारात मश्गूल!
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना लोंढे म्हणाले, बाजारात तांदूळ 80 रुपये किलोवर गेला आहे, गोडेतेल 200 रुपयांच्या पार पोहोचले आहे आणि पिठाचे भाव गगनाला भिडले आहेत. ऑक्टोबर महिन्यातच नद्या कोरड्या पडल्या असून जलसाठे 50 टक्क्यांपेक्षा खाली आले आहेत.
संवेदनशीलतेचा अभाव
“कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते की, मनापासून सेकंदाचा 60 वा भाग जरी भक्ती दिली तरी ती देवाला मान्य असते. देवीची आराधना करायला आमचा विरोध नाही, आम्हीही रोज पूजा करतो; परंतु दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या लेकी-बाळींना दिवाळी-दसरा साजरा करता येत नसताना असा पैशांचा माज दाखवणे म्हणजे विकृती आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी दुष्काळी भागाचे दौरे सोडून विधान परिषदेच्या छोट्याशा निवडणुकीत ठाण मांडून बसणे अत्यंत लज्जास्पद आहे.”
बलात्काराला सकारात्मक उत्तर कसे देणार?
राष्ट्रसेविका समितीच्या मेळाव्यातील वक्तव्यावर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. “राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीत महिलांवरील अत्याचारावर बोलताना ‘सकारात्मक उत्तर द्या, दिमागी नक्षल बनू नका’ असा सल्ला दिला गेला. पीडित मुलींनी बलात्काराचे सकारात्मक उत्तर कसे द्यायचे? मुलींनी आधी सरकारची परवानगी घ्यायची का तक्रार करण्यासाठी? प्रज्वल रेवण्णा, कुलदीप सेंगर आणि ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या पाठीशी उभे राहणे म्हणजे सकारात्मकता का? अंकिता भंडारी प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्या व्यवस्थेवर शांताक्का का बोलत नाहीत? देवेंद्र फडणवीस हे केवळ नेते नसून गृहमंत्री आहेत, त्यांना हा जाब विचारण्याची हिंमत दाखवावी.”
नागपूरच्या मुख्यालयावर 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही; आता देशप्रेमींवरच गुन्हे!
आंदोलक अभिजीत दीपके यांच्या अटकेवरून आणि तिरंगा आंदोलनावरून सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, “आरएसएसने स्वतःच्या मासिकांमधून राष्ट्रध्वज तिरंग्याचा आणि संविधानाचा तिरस्कार केला होता. नागपूरच्या मुख्यालयावर सलग 52 वर्षे तिरंगा फडकवला गेला नाही, तिथे राष्ट्रध्वज लावणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर खटले भरले गेले. आज शांततेच्या मार्गाने संविधानासाठी तिरंगा हातात धरून आंदोलन करणाऱ्या तरुणांना पोलीस विनाकारण डांबून ठेवत आहेत. मात्र, इंग्रजांप्रमाणे दडपशाही करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, संविधानासाठी लढणाऱ्यांच्या इराद्यांपेक्षा त्यांच्या तुरुंगातील गजांची ताकद जास्त नाही.”
काँग्रेस मेळावा पूर्वनियोजित
काँग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. “एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक प्रवर्गातील कार्यकर्त्यांचे 2 दिवसांचे शिबिर हे 2 महिन्यांपूर्वीच निश्चित झाले होते. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार केवळ उद्घाटनापुरते गेले होते आणि ते पुन्हा प्रचारात सक्रिय झाले आहेत.”
विदर्भातील सर्व जागांवर आघाडी
वर्ध्यात रणजीत कांबळे, चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर, भंडारा-गोंदियात नाना पटोले आणि नागपुरात नितीन राऊत, सुनील केदार, विकास ठाकरे यांच्यासह संपूर्ण काँग्रेस आघाडी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा पराभव करण्यासाठी एकजुटीने मैदानात उतरली आहे, असे अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले.
———————————————–
हेही वाचा…
पुण्यात चिवटेंचा बळी देऊन सानपांना बळ!: सुषमा अंधारे म्हणाल्या- मजबुरी का नाम मंगेश चिवटे, उद्या उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आल्यास उदय सामंत भाजपात जातील

“पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत विसंवाद आणि कुरघोडीचे राजकारण आता चव्हाट्यावर आले आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांना स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून त्यांचा बळी दिला गेला. ‘मजबुरी का नाम महात्मा गांधी’ ऐकले होते, पण आता ‘मजबुरी का नाम मंगेश चिवटे’ अशी परिस्थिती झाली आहे. अपक्ष रिंगणात उतरलेले सचिन सानप हे एकनाथ शिंदेंचे नव्हे, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय आहेत. उद्या जर भाजपने उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली, तर उदय सामंत क्षणाचाही विलंब न लावता तिकडे उडी मारतील; कारण उदय सामंत हे दुसरे-तिसरे कोणी नसून ‘एकनाथ शिंदे 2.0’ आहेत,” असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी