![]()
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघातील निवडणूक चुरशीची बनली आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अधिकृत पत्र काढून अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. यापूर्वी शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांनी अर्ज मागे घेत आता ते स्वतः सचिन सानप यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. शिवसैनिकांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये यासाठी, ‘मंगेश चिवटे म्हणजेच सचिन सानप’ अशी खास टॅगलाईन वापरत सानप यांना पहिल्या पसंतीचे मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरीकडे, भाजपने या मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना दिलेल्या या थेट पाठिंब्यामुळे आता पुणे शिक्षक मतदारसंघात सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्येच मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘मंगेश चिवटे म्हणजे सचिन सानप’ मंगेश चिवटे हे आज सोलापूर येथे असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सचिन सानप यांना पहिल्या क्रमांकाचे मतदान करा. ‘मंगेश चिवटे म्हणजे सचिन सानप’ ही टॅग लाइन लक्षात ठेवा. सचिन सानप हे माझे मोठे भाऊ आहेत. सचिन भाऊंच्या प्रचाराचा झंझावात पाहून कौस्तुभ गावडे यांनी माघार घेतली तर आश्चर्य वाटायला नको, असा टोलाही चिवटे यांनी लगावला आहे. मंगेश चिवटे यांनी माघार घेतल्यानंतर नाराज असल्याची चर्चा होती. यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, जर मी नाराज असतो तर सचिन भाऊंसाठी रात्रीचा दिवस केला नसता. एक वेगळी अदृश्य शक्ती आम्ही सचिन सानप यांच्या मागे उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे चिवटे यांनी म्हटले. ‘कौस्तुभ गावडेंचा आतून सचिन सानप यांना पाठिंबा’ दरम्यान, भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की मंगेश चिवटे हे आमच्या संपर्कात असून त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. यावर उत्तर देताना चिवटे म्हणाले, मी पण म्हणतो कौस्तुभ गावडे माझ्या संपर्कात आहेत आणि कौस्तुभ गावडे यांचा आतून सचिन सानप यांना पाठिंबा आहे आणि कौस्तुभ गावडे कदाचित सचिन सानप यांचा प्रचाराचा झंझावात पाहून, शिंदेंचे एक वेगळे रूप पाहून गावडेंनी पुढच्या दोन दिवसात उमेदवारी मागे घेतली तर आश्चर्य वाटायला नको, असेही त्यांनी म्हटले. सचिन सानप काय म्हणाले? यावेळी सचिन सानप यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील 16 वर्ष मी शिक्षक संघटनेत काम करतोय आणि मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली आणि मंगेश चिवटे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज दाखल केला होता. एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांचा करंट ओळखला, इथे नाशिक पॅटर्न नाही तर शिक्षक पॅटर्न चालणार असल्याचे त्यांनी ओळखले. माझ्या प्रचारासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. 3 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मला पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. शिक्षकांच्या भावना एकनाथ शिंदे यांनी ओळखल्या. खरे तर मंगेश चिवटे यांनी तयारी केली होती, मेटर शिंदेंच्या एका शब्दावर ते माझ्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही पक्षाचे आमदार आगीचे बंब ओतत आहेत, तो विझवण्यासाठी हा प्रयत्न सुरूये. मी शिक्षक प्राध्यापक म्हणून निवडणूक लढतोय मला पक्ष प्रवेश करण्याची आवश्यकता नाही. पुढे बोलताना सचिन सानप म्हणाले, पुणे पदवीधर बाबत पक्षाकडून आणखी सूचना आलेल्या नाहीयेत. शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असला पाहिजे, बदल्यांच्या नावावर धमक्या देणारे संस्था चालक चालणार नाहीत, 6 तारखेला फॉर्म भरण्याची मुदत संपली आणि 3 तारखेला कौस्तुभ गावडे यांना 30 वर्ष पूर्ण झाली, मात्र आपल्याकडे 30 वर्ष अनुभव असणारे शिक्षक आहेत. एखाद्या उमेदवारात एवढी इमॅच्यूरिटी असेल तर मी त्यांच्याबद्दल काय बोलणार, असेही सानप म्हणाले.
Source link
'मंगेश चिवटे म्हणजे सचिन सानप' ही टॅग लाइन लक्षात ठेवा:सानप यांच्या प्रचारासाठी चिवटे मैदानात; भाजप उमेदवार कौस्तुभ गावडेंना टोला