![]()
राज्यातील दुष्काळी परिस्थिती भीषण असून, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता हेक्टरी एक लाख रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. सरकारकडून जाहीर करण्यात आलेली पाच हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवाळीपूर्वी मोठे आंदोलन उभारणार असून, सरकारला दिवाळी साजरी करू द्यायची नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पवार म्हणाले, ‘‘विविध तालुक्यांना भेटी देऊन शेतकरी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. राज्यात पावसाची मोठी तूट असून, आगामी काळ शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण जाण्याची शक्यता आहे. माझ्या मतदारसंघात सरासरीच्या तुलनेत केवळ ३० टक्के पाऊस झाला आहे. नाशिक विभागात ३४ टक्के, तर पुणे विभागात ३१ टक्के पावसाची नोंद झाली आहे.’’ धरणांमधील पाणीसाठाही कमी होत असून, पुण्यातील धरणांमधील साठा ९३ टक्क्यांवरून ८१ टक्क्यांवर आला आहे, तर उजनी धरणातील पाणीसाठा ८० टक्क्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले. पीक खर्च जास्त, मदत मात्र तुटपुंजी खरीप हंगामातील पेरणी कमी झाली असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सोयाबीनसाठी हेक्टरी २८ हजार रुपये खर्च येत असताना सरकार केवळ पाच हजार रुपये मदत देत आहे. लातूरमधील शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधताना त्यांनी नुकसानीची माहिती घेतली. पंचनामे करण्यासाठी अधिकारी आले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. एकरी सव्वा लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च झाल्याने पाच हजार रुपयांची मदत न मिळालेलीच बरी, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. फळबागा वाचवण्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे. राज्यातील २.७८ कोटी पशुधनासाठी चारा उपलब्धतेचे नियोजन करावे आणि मेंढपाळांसाठी स्वतंत्र योजना आणावी, अशी मागणीही त्यांनी केली. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, सरकारच्या खर्चावर टीका करताना त्यांनी नव्या गाड्या, अधिकाऱ्यांचे लंडन दौरे, शक्तिपीठ महामार्ग आणि कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या खर्चाचा उल्लेख केला. सामान्य नागरिकांच्या करातून जमा होणारा पैसा शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी वापरण्याऐवजी अनावश्यक खर्चावर उधळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
Source link
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या:रोहित पवार म्हणाले, 5 हजारांची मदत क्रूर थट्टा; दिवाळीपूर्वी आंदोलन करणार