Headlines

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांवर सायबर संस्कार व्हावेत:डॉ. दीपक शिकारपूर यांचे दादासाहेब केतकर स्मृतिदिनानिमित्त पुणे विद्यार्थी गृहात व्याख्यान




तंत्रज्ञानात वेगाने क्रांती घडत आहे. तंत्रज्ञानाचा वेग कोणीही थांबवू शकत नाही. काळानुरूप बदलते तंत्रज्ञान वाईट नसते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो यावर त्या तंत्रज्ञान, वापरकर्त्याचा लौकिक अवलंबून असतो. शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांवर सायबर संस्कार होण्याची आवश्यकता असून मार्गदर्शकाच्या भूमिकेतून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगला माणूस म्हणून घडविल्यास, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिल्यास हेच तंत्रज्ञान विद्यार्थ्यांचे भविष्य घडवेल, असा विश्वास संगणकतज्ज्ञ व लेखक डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केला. बदलत्या काळानुसार पुणे विद्यार्थी गृहाने बहुभाषिक धोरण स्वीकारल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुणे विद्यार्थी गृहाचे कुलगुरू कै. विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांच्या ७६व्या स्मृतिदिनानिमित्त सहकारनगरमधील संस्थेच्या दादासाहेब केतकर सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात डॉ. दीपक शिकारपूर ‘तंत्रज्ञानाला विवेकाची जोड : एआय युगातील शिक्षक आणि सायबर संस्कार’ या विषयावर बोलत होते. संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, उपकार्याध्यक्ष अमोल जोशी, एस. एस. जिर्गे, कार्यवाह संजय गुंजाळ, कोषाध्यक्ष कृष्णाजी कुलकर्णी, कुलसचिव दिनेश मिसाळ, भालचंद्र कुलकर्णी मंचावर होते. दादासाहेब केतकर यांचे नातू कॅप्टन राजीव केतकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानात कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर, शिक्षकांची भूमिका आणि सायबर सुरक्षिततेवर भर या विषयावर बोलताना डॉ. दीपक शिकारपूर पुढे म्हणाले, रोजगारक्षम विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा सहाय्यक म्हणून वापर केला तर भविष्यात शिक्षकांच्या हातूनच क्रांती घडेल. आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थी आत्मसात करतात पण त्याचा उपयोग कसा असावा यासाठी शिक्षण संस्था, शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने व्हावा यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याची आवश्यकता आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, अज्ञानामुळे मुलांच्या हातून चुकीच्या पद्धतीने तंत्रज्ञानाचा होणारा वापर टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात या विषयी त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *