![]()
राज्यात उसाच्या दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुद्ध राज्य सरकार आणि साखर कारखानदार असा संघर्ष तीव्र झाला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या दबावाखाली येऊन राज्य सरकार कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी याला दाद न दिल्याने आता धरणांमधून पाणी कपात करून शेतकऱ्यांचा ऊस वाळवण्याचा आणि त्यांना कारखान्याकडे ऊस नेण्यास भाग पाडण्याचा डाव मुख्यमंत्र्यांनी आखला आहे, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. वेळप्रसंगी आम्ही स्वतः धरणावर जाऊन पाणी सोडू, असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे. ‘दबावाला भीक घातली नाही, ९५ टक्के कारखाने बंदच’ आपली भूमिका स्पष्ट करताना राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी टाकलेल्या दबावाला बळी पडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्यांवर दबाव आणला आणि गेल्या १५ दिवसांत कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यातील स्वाभिमानी शेतकऱ्यांनी या दबावाला अजिबात भीक घातलेली नाही. म्हणूनच, आजही राज्यातील जवळपास ९५ टक्के साखर कारखाने बंद अवस्थेत आहेत.” पाणी कपातीवरून मुख्यमंत्र्यांवर घणाघात शेतकरी ऐकत नसल्याचे पाहून सरकारने आता पाणी कपातीचे हत्यार उपसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. “शेतकऱ्याला अडचणीत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता नदीतले पाणी संपवण्याचा डाव टाकला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यांतील धरणे १०० टक्के भरलेली आहेत. जायकवाडी आणि उजनी धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील केवळ दोन-चार टक्के पाणीसाठाच आतापर्यंत वापरला गेला आहे. असे असतानाही, पाणी कपात करून शेतकऱ्यांचा ऊस वाळवायचा आणि त्यांना नाईलाजाने कारखान्याला ऊस घालण्यास भाग पाडायचे, हे कारस्थान मुख्यमंत्री करत आहेत. आपल्याला हे कारस्थान हाणून पाडायचे आहे,” असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. ‘वेळप्रसंगी धरणावर जाऊन स्वतः पाणी सोडू’ पाणी कपातीच्या निर्णयावरून राजू शेट्टी यांनी थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही जाब विचारला आहे. “मी जलसंपदा मंत्र्यांना विचारले की, कालवा समितीची कोणतीही बैठक न घेता तुम्ही कोणत्या आधारावर पाणी कपात लागू केली? पाण्याचे काय नियोजन आहे? याचे कोणतेही गणित सरकारकडे नाही. जर अशा पद्धतीने नद्या कोरड्या करून शेतकऱ्यांची कोंडी करणार असाल, तर वेळप्रसंगी आम्ही स्वतः धरणावर जाऊन आमच्या हाताने पाणी सोडू. सरकारच्या या दबावशाहीला शेतकरी अजिबात जुमानणार नाहीत, हे सरकारने ध्यानात ठेवावे,” असा सज्जड दम राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टींच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता ऊस दराचा आणि पाणी कपातीचा प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. —————- हेही वाचा.. ऊस दराचा भडका!: दर जाहीर न करताच कारखाने सुरू केल्याने स्वाभिमानी आक्रमक; शिरूरमध्ये उसाचा ट्रॅक्टर पेटवला यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाचा दर अद्याप जाहीर न करताच साखर कारखान्यांनी गाळप सुरू केल्याने शेतकरी संघटनांचा संताप आता उफाळून आला आहे. शिरूर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखाना परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत उसाची वाहतूक करणारी वाहने रोखली. इतकेच नाही, तर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. सविस्तर वाचा
Source link
मोदी-शहांच्या दबावाला शेतकरी जुमानत नाहीत:म्हणून आता पाणी कपातीचा डाव, राजू शेट्टींचा मुख्यमंत्री फडणवीसांवर आरोप