Headlines

ऊस दराचा भडका!:दर जाहीर न करताच कारखाने सुरू केल्याने स्वाभिमानी आक्रमक; शिरूरमध्ये उसाचा ट्रॅक्टर पेटवला




यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाचा दर अद्याप जाहीर न करताच साखर कारखान्यांनी गाळप सुरू केल्याने शेतकरी संघटनांचा संताप आता उफाळून आला आहे. शिरूर तालुक्यातील घोडगंगा साखर कारखाना परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत उसाची वाहतूक करणारी वाहने रोखली. इतकेच नाही, तर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. ‘स्वाभिमानी’चा इशारा धुडकावल्याचा संताप साखर कारखानदारांनी जोपर्यंत उसाचा अंतिम दर जाहीर करत नाहीत, तोपर्यंत कारखाने सुरू करू नयेत, अशी स्पष्ट भूमिका आणि मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मांडली होती. वारंवार विनंती करून आणि पूर्वकल्पना देऊनही कारखानदारांनी मनमानी करत कारखाने सुरू केले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ऊस वाहतूक रोखण्यास सुरुवात केली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता दरवर्षी उसाचा वाढता उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात पदरात पडणारा दर यावरून शेतकरी आणि कारखानदार यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळतो. यंदाही दर निश्चितीच्या मागणीवरून आंदोलनाची ठिणगी पडली आहे. उसाची वाहने पेटवून देण्याच्या या घटनेमुळे प्रशासनासमोर आता कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आता साखर कारखानदार आणि स्थानिक प्रशासन काय भूमिका घेणार? तसेच शेतकरी संघटनांशी चर्चा करून ऊस दराची कोंडी फुटणार का? याकडे संपूर्ण राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. —————– हेही वाचा.. ‘आधी साखरेची एमएसपी वाढवा, मगच कारखाने सुरू करा’:राजू शेट्टी आक्रमक, कारखान्याच्या गव्हाणीत उतरण्याचा इशारा
साखरेच्या किमान विक्री किमतीत (एमएसपी) वाढ करण्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी साखर कारखान्यांविरोधातील आंदोलन तीव्र केले आहे. साखरेची एमएसपी निश्चित झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, अशी भूमिका घेत राजू शेट्टी यांनी कृष्णा सहकारी साखर कारखाना प्रशासनाशी चर्चा केली. यावेळी कारखान्याचे गाळप बंद पाडण्याचा इशारा देत, ‘कारखाना पुन्हा सुरू झाला तर आम्ही पुन्हा येथे येऊन बसणार. यावेळी वजनकाट्यावर ठिय्या देणार आणि मागे हटणार नाही,’ असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *