![]()
छत्रपती संभाजीनगरमधील विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये निर्माण झालेला गैरसमज अखेर दूर झाले आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार सतीश चव्हाण यांनी आज जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीतील वादळ शमले असून, शिवसेना ताकदीनिशी सतीश चव्हाण यांच्या पाठीशी उभी राहील, अशी घोषणा केली. काय होता नेमका वाद आणि तो कसा मिटला? गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेने सतीश चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याबाबत स्पष्टीकरण देताना संजय शिरसाट म्हणाले की, “अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे असताना तिथे एका कार्यकर्त्याने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या बंडखोरीला आळा बसावा आणि युतीमध्ये एकदिलाने काम व्हावे, यासाठी एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात सतीश चव्हाणांना तात्पुरता पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला होता. याचा अर्थ महायुती तोडायची असा अजिबात नव्हता.” या घडामोडींनंतर खासदार सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. तसेच, काल मंत्री चंद्रकांत बावनकुळे आणि उदय सामंत यांनी अमरावतीचा दौरा करत समन्वय साधला. अमरावतीच्या सभेत बंडखोर उमेदवाराला कोणीही सहकार्य करणार नाही आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार अविनाश सरनाईक यांनाच निवडून आणले जाईल, असा शब्द देण्यात आला. अमरावतीचा प्रश्न सुटताच, एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात सतीश चव्हाण यांना ‘तन-मन-धनाने’ पाठिंबा देण्याचे आदेश दिल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. “हे दबावतंत्र नव्हे, तर युतीचा धर्म” सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढून घेणे हा शिवसेनेच्या दबावतंत्राचा भाग होता का? या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना शिरसाट यांनी हा आरोप फेटाळून लावला. “हे कोणतेही दबावतंत्र नव्हते. महायुतीमध्ये सर्वांनी ताकदीने आणि एकत्र लढले पाहिजे, हाच यामागचा उद्देश होता. जेव्हा वरिष्ठांचा आदेश येतो, तेव्हा सर्वांनी एकत्र राहणे आवश्यक असते. आता आमचे सर्व गैरसमज दूर झाले असून महायुतीच्या पाचही जागा प्रचंड बहुमताने कशा निवडून येतील, याकडे आमचे लक्ष आहे,” असे शिरसाट म्हणाले. पुण्यातील लढत ‘मैत्रीपूर्ण’ पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना दिलेल्या पाठिंब्याबाबत विचारले असता, शिरसाट यांनी सावध भूमिका घेतली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सामंजस्याने हा निर्णय घेतला असेल, तर त्याला बंडखोरी न म्हणता ती एक ‘मैत्रीपूर्ण लढत’ असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, सतीश चव्हाण यांनीही महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्व गैरसमज दूर केले असून, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते आता मोठ्या उत्साहाने काम करतील आणि मराठवाड्याच्या इतिहासात आतापर्यंत झाला नसेल एवढा मोठा विजय आम्हाला मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. ————————– हेही वाचा.. प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण: ठाण्यात राम पूर्णेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांनी दिले न्यायाचे आश्वासन, 2 दिवसांत पुन्हा बोलावले
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील नेते प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी एक मोठी घडामोड समोर आली आहे. प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी पूर्णेकर कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करत त्यांना न्यायाचे आश्वासन दिले आहे. सविस्तर वाचा
Source link
आता आम्ही तन-मन-धनाने सोबत..:नाराजी नाट्यावर पडदा पडताच संजय शिरसाटांची घोषणा; सतीश चव्हाण म्हणाले- मराठवाड्यात ऐतिहासिक विजय मिळवू