![]()
“महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेली परिस्थिती 1972च्या ऐतिहासिक दुष्काळापेक्षाही अधिक भीषण आणि भयानक आहे. जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. अशा आणीबाणीच्या काळात वेगवेगळ्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ वातानुकूलित दालनात बसून कागद नाचवणे आणि आश्वासनांची खैरात करणे बंद करावे; महसूल व पालिका यंत्रणेने प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरून काम केले तरच सामान्य माणसाला खरा दिलासा मिळेल,” असा रोखठोक इशारा बार्शीचे आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी दिला आहे. बार्शी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार सोपल यांनी सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई, उजनी धरणाचे नियोजन, मुळशी धरणातील अतिरिक्त पाण्याचा वापर, भारनियमन आणि मतदार यादीतील धक्कादायक बनावट नावांवरून प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले. 1972च्या दुष्काळापेक्षाही दाहक परिस्थिती; जून अखेरपर्यंत पाणी जपून वापरावे लागेल दुष्काळाच्या दाहकतेवर बोलताना दिलीप सोपल म्हणाले, “बार्शी तालुक्यातील पाझर तलावांपासून ते मध्यम प्रकल्पांपर्यंत एकाही जलसाठ्यात यंदा पावसाचे पाणी आलेले नाही. आमच्या भागात जून महिन्याच्या अखेरीस कधी पाऊस पडेल याचा भरवसा नसतो. त्यामुळे उपलब्ध पाणी पुढील जून महिन्याच्या अखेरपर्यंत अत्यंत काटकसरीने वापरावे लागणार आहे.” स्वतः शॉवर बंद करून बादलीने अंघोळ दुष्काळाचे गांभीर्य जनतेनेही ओळखणे गरजेचे असल्याचे सांगताना ते म्हणाले, “मी स्वतः गेल्या 1 महिन्यापासून शॉवर बंद केला असून 1 ते 1.5 बादली पाण्यात अंघोळ करत आहे. ज्यांच्याकडे शॉवर किंवा मुबलक पाणी आहे, त्यांनीही पाणी बचतीची सवय लावून घेतली पाहिजे. दुष्काळाच्या खऱ्या आणि तीव्र झळा येत्या जानेवारी महिन्यानंतर अधिक जाणवणार आहेत.” टाटांच्या मुळशीचे पाणी समुद्रात सोडण्याऐवजी भीमा खोऱ्यात वळवा वीज प्रकल्प आणि जलव्यवस्थापनावर सोपल यांनी तांत्रिक उपाय सुचवले, “विद्युत निर्मितीसाठी टाटा उद्योग समूहाचे मोठे प्रकल्प आहेत. जलविद्युत निर्मितीनंतर उर्वरित अतिरिक्त पाणी समुद्रात वाया जाते. हे पाणी समुद्राला जाण्याऐवजी भीमा खोऱ्यात सोडले पाहिजे, जेणेकरून ते उजनी धरणात येईल आणि संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला त्याचा मोठा फायदा होईल. पाण्यासाठी मुळशीवर अवलंबून राहण्याऐवजी कोळसा व अणुऊर्जेवर आधारित वीजनिर्मिती प्रकल्पांचा वापर वाढवला पाहिजे. उजनी धरण भरलेले असले तरी सोलापूर जिल्ह्यात आजवर उजनीच्या पाण्याचे योग्य व काटेकोर नियोजन कधीच झाले नाही. यंदा तरी प्रशासनाने जून महिन्यापर्यंतचे काटेकोर जलनियोजन केले पाहिजे.” लोडशेडिंगचे गौडबंगाल “गावांमध्ये केवळ 2 ते 3 तास वीज दिली जात आहे. एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना विचारले तर ते उत्पादन कमी असल्याचे सांगतात, तर शासन स्वतःला विजेमध्ये ‘सरप्लस’ (अतिरिक्त) असल्याचे सांगते. नॅशनल ग्रीड असताना हे लोडशेडिंग कशासाठी चालले आहे, याचे खरे कारण जनतेसमोर आले पाहिजे.” बार्शी शहरात पाण्याचा बोजवारा बार्शी शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत प्रशासनाची पोलखोल करताना ते म्हणाले, “बार्शीत गेली 9 वर्षे एकाच पक्षाची सत्ता आहे, पण शहराचा पाणीप्रश्न सुटलेला नाही. प्रशासनाकडून विहिरींमधून 6 लाख लिटर पाणी मिळत असल्याचे खोटे आकडे सांगितले जातात. चांगल्या पावसाच्या काळातही या विहिरींमधून कधी 6 लाख लिटर पाणी निघालेले नाही. उजनीवरून येणाऱ्या कालव्याच्या उपसा सिंचन योजनेची केवळ 4 ते 5 आवर्तने मिळतात; त्यावर शहराचा बारामाही पाण्याचा प्रश्न कसा सुटणार?” अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव? “पाणीपुरवठा अधिकारी, पालिका प्रशासन आणि कंत्राटदारांनी जबाबदारीने काम केले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. अधिकाऱ्यांवर कोणाचा राजकीय दबाव आहे, हे त्यांनीच स्पष्ट करावे. पाणीप्रश्नावर नगरसेवकांनी 2 दिवस उपोषण केले होते, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे.” 5 हजार रुपयांची मदत “शासनाने जाहीर केलेल्या 5,000 रुपयांच्या अग्रिम मदतीने शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, महागाई प्रचंड आहे; पण किमान शासनाने 5,000 रुपये देण्याची दानत तरी दाखवली, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या साहाय्यता निधीला आमदार वेतन देण्याचा निर्णय पक्षप्रमुख व प्रतोद घेतील आणि आम्ही संवेदनशीलपणे ते नक्कीच देऊ.” जॉर्ज फर्नांडिस आले अन् मतदान करून गेले! निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’ (SIR) मोहिमेवर आणि मतदार यादीतील घोळावर त्यांनी अत्यंत उपरोधिक व स्फोटक भाष्य केले. “एसआयआर मोहिमेमुळे दुबार नावे वगळली गेली ही चांगली बाब असली, तरी विधानसभा निवडणुकीच्या वेळी नियमांची पायमल्ली झाली. बार्शी तालुक्यातील कांदलगाव, शिराळे या गावांमध्ये आवतरामानी, उत्तमचंदानी, जॉर्ज फर्नांडिस आणि रेमो फर्नांडिस अशी नावे मतदार यादीत आली होती!” इतिहासात नसलेली नावे मतदानाला कशी? “या गावांच्या मागील 1,000 वर्षांच्या इतिहासात या आडनावाची किंवा नावाची माणसे कधी जन्मली नाहीत किंवा राहिली नाहीत. तरीही ती नावे यादीत आली, तो ‘फर्नांडिस’ आला आणि प्रत्यक्ष मतदान करून गेला! त्याने कोणाला मतदान केले हे गुप्त असले, तरी अशा बोगस मतदारांमुळे संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे,” असा टोला दिलीप सोपल यांनी शेवटी लगावला. ———————————————————– हेही वाचा… कौशल्य विकासाच्या नावाखाली 400 कोटींचा डल्ला!: भाजप पदाधिकाऱ्याच्या संस्थेकडून तिजोरीवर दरोडा; विजय वडेट्टीवारांचा घोटाळ्याचा आरोप, SIT चौकशीची मागणी राज्यातील 15 ते 45 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योग विकास अभियानात तब्बल 400 कोटी रुपयांचा महाघोटाळा झाला आहे. नागपूर आणि विदर्भात भाजपच्या एका बड्या पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने चालणाऱ्या ‘पुष्पांजली फाउंडेशन’सह इतर बोगस संस्थांनी एकाही तरुणाला प्रशिक्षण न देता, बनावट नोंदी आणि विद्यार्थ्यांची परस्पर माहिती गोळा करून शासकीय तिजोरीवर थेट डल्ला मारला आहे. अमरावतीच्या येवदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही मुख्य सूत्रधाराला अटक होत नाही, कारण या घोटाळ्यातील पैशांचे धागेदोरे थेट भाजपच्या एका नेत्याच्या बँक खात्यापर्यंत पोहोचले आहेत. या राज्यव्यापी भ्रष्टाचाराची व्याप्ती 1 हजार कोटींच्या घरात असून, याची एसआयटी (SIT) किंवा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत (EOW) तातडीने चौकशी झाली पाहिजे,” असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
1972 पेक्षाही भीषण दुष्काळ, अधिकाऱ्यांनी ग्राउंडवर उतरावं!:आमदार दिलीप सोपल यांची प्रशासनावर टीका, मुळशीचे पाणी भीमा खोऱ्यात सोडण्याची मागणी