![]()
हिंगोली जिल्ह्यात अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता प्रत्येक गावागावात पाणी वापराच्या काटकसरीबाबत व्यापकप्रमाणात जनजागृती करा अशा सूचना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शनिवारी ता. 17 ऑनलाईन बैठकी दिल्या. मात्र पालकमंत्र्यांचे हिंगोली जिल्ह्यावरील प्रेम पुतणा मावशीचे असल्याचा आरोप क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी केला आहे. पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष जिल्ह्यात येऊन माहिती घेणे अपेक्षित होती असे ते म्हणाले. पालकमंत्री झिरवाळ यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड,पूर्णा पाटबंधारे विभाग वसमतचे कार्यकारी अभियंता आर.पी. गरुड, जिल्हा जलसंधारण अधिकारी सोनाली ढोके, हिंगोली नगर परिषदेच्या मुख्याधिकारी प्रांजली मुंडे, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे राजू नरवाडे, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर कचकलवार यांची उपस्थिती होती. पालकमंत्री झिरवाळ म्हणाले की, संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठ्याचे ता. 31 ऑगस्ट पर्यंतचे नियोजन करावे, जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांतील उपलब्ध जलसाठ्याचे धरणनिहाय पाणी वापर नियोजन करावे. जलाशयाच्या उपलब्ध जिवंत साठ्यापैकी 10 टक्के अतिरिक्त बफर, आपत्कालीन साठा राखून ठेवणे, नागरी, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत पाणी वापरात 10 टक्के कपात करणे, रब्बी हंगामी पिके, चारा पिकांसाठी सिंचन पाळी, आर्वतनाचे वेळापत्रक निश्चित करणे आदी बाबींचाही आढावा पालकमंत्री झिरवाळ यांनी घेऊन योग्य त्या सूचना केल्या. दरम्यान, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी संताप व्यक्त केला. हिंगोली जिल्हा दुष्काळात होरपळत असतांना पालकमंत्री झिरवाळ ऑनलाईन बैठका घेत आहेत. प्रत्यक्ष जिल्ह्यात येऊन बघितलेली परिस्थिती अन ऑनलाईन घेतलेली माहिती यामध्ये मोठा फरक आहे. पालकमंत्र्यांनी ऑनलाईन घेतलेल्या बैठकीच्या सूुचना शासनानेही दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून कार्यवाही देखील केली जात आहे. उलट पालकमंत्री झिरवळांनी ऑनलाईन घेतलेल्या बैठकीत नवीन काय सुचना दिल्या हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे त्यांनी दाखविलेले प्रेम पुतणा मावशीचे असून आगामी काळात पालकमंत्र्यांच्या विरोधात तिव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
Source link
पालकमंत्र्यांचे हिंगोली जिल्ह्यावरील प्रेम पुतणा मावशीचे:क्रांतीकारी शेतकरी संघटनेचा आरोप, ऑनलाईन बैठकीतून दिलेल्या सुचनांमुळे संताप