Headlines

कोल्हापूर हादरले:गळ्यावर वार करत 15 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू, माणगावमधील घटना




कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. 17 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात हा प्रकार घडला. हल्ल्यानंतर पसार झालेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शनिवारी रात्री ती माणगाव येथील मंदिर परिसरात असतानाच तिच्यावर अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने अचानक प्राणघातक हल्ला केला. संशयिताने मुलीच्या गळ्यावर वार केला, तसेच तिच्या दंडालाही गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात ती रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तिला तातडीने इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू हल्ला केल्यानंतर संशयित तरुण घटनास्थळावरून तात्काळ पळून गेला. तो पळत असताना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांकडून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करून संशयिताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हातकणंगले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, संशयिताचा माग काढण्यासाठी श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयिताला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. हे ही वृत्त वाचा

दुष्काळग्रस्तांना 5 हजारांची मदत फेकून मारली, पण निवडणुकांवर लाखांची उधळण:कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांचे खिसे झटकले तरी1 लाख कोटी मिळतील- संजय राऊत

राज्याच्या तिजोरीत पैसा नाही, मात्र जे राज्य चालवत आहेत, त्यांच्याकडे तिजोरीच्या लुटीतून आलेली प्रचंड संपत्ती आहे. सर्वात जास्त पैसा भाजप आणि शिंदे गटाकडे आहे. हा पैसा कुठून आणि कसा आला, याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केल्यास राज्याचे कर्ज आपोआप कमी होईल. एवढेच नव्हे, तर कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांचे खिसे झटकले तरी 1 लाख कोटी रुपये जमा होऊ शकतात, असा घणाघाती आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *