![]()
“राज्यातील गोरगरीब, कष्टकरी आणि कामगारांना रेशनचे धान्य मिळवण्यासाठी कामावरून सुट्टी काढून दुकानांसमोर तासनतास रांगेत उभे राहावे लागणार नाही. आता लाभार्थी दिवसभरात किंवा रात्री कधीही जाऊन थेट स्वयंचलित मशिनद्वारे धान्य घेऊ शकतील. कोका-कोला किंवा चॉकलेटच्या वेंडिंग मशिनप्रमाणे येथे पैसे टाकण्याची गरज नाही; लाभार्थ्याने ओळख पडताळणीसाठी क्रमांक टाकून अंगठा लावला की अवघ्या 35 सेकंदांत तब्बल 25 किलो धान्य थेट पोत्यात पडेल. ‘धान्य एटीएम’सारखी ही 24 तास चालणारी आधुनिक प्रणाली राज्यात सुरू करण्यात येत आहे,” अशी घोषणा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेतील (PDS) नव्या सुधारणा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गोदामांमधील काळाबाजार रोखण्यासाठी आखलेली नवी प्रणाली आणि आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाहेरील भाविकांसाठी अन्नधान्य वितरणाबाबत सविस्तर माहिती दिली. 35 सेकंदांत 25 किलो धान्य; मापात पाप नाही अन् 24 तास सेवा सुरू! अन्नपूर्ती व आधुनिक वेंडिंग यंत्रणेची वैशिष्ट्ये मांडताना छगन भुजबळ म्हणाले, “रेशन दुकान बंद होण्याची किंवा दुकानदाराची वाट पाहण्याची गरज आता उरलेली नाही. ही यंत्रणा 24 तास अविरत काम करेल. एखाद्या मजुराला किंवा कष्टकऱ्याला रात्री कामावरून परतताना धान्य हवे असेल, तरी ती सोय उपलब्ध असेल.” हायटेक कार्यक्षमता “या स्वयंचलित मशिनमध्ये एका वेळी तब्बल 2,500 किलोग्रॅम म्हणजेच 25 क्विंटल धान्य साठवून ठेवण्याची प्रचंड क्षमता आहे. सुरुवातीला समजून घेण्यासाठी लाभार्थ्यांना अर्धा ते 1 मिनिट लागेल; मात्र एकदा सवय झाल्यावर अवघ्या 35 सेकंदांत 25 किलो धान्य अचूक वजनासह वितरीत होईल. यामुळे ‘मापात पाप’ किंवा धान्य गळतीचा प्रश्नच उद्भवणार नाही.” बायोमेट्रिक सुरक्षितता ही प्रणाली बायोमेट्रिक पडताळणी आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने कोणाचाही हक्क मारला जाणार नाही अथवा धान्याची चोरी होणार नाही. या उपक्रमाला जागतिक अन्न कार्यक्रमाचे (WFP) तांत्रिक सहकार्य लाभले आहे. एकदा पोतं भरलं की थेट रेशन दुकानातच उघडणार! धान्य वाहतूक आणि वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना ते म्हणाले, “पूर्वी प्रमुख गोदामातून धान्य उचलून दुसऱ्या गोदामात आणायचे, पोते उसवायचे, धान्य खाली करायचे, पुन्हा नव्या गोणीत भरायचे आणि मग ट्रकमध्ये टाकून दुकानात पाठवायचे. या सगळ्या उपद्व्यापात प्रचंड धान्य गळती आणि गैरप्रकार व्हायचे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या नव्या कार्यक्रमानुसार हा प्रकार आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. एकदा मुख्य गोदामातून पोते भरून निघाले की ते थेट रेशन दुकानातच उतरेल, मधल्या फळीतील गैरप्रकारांना चाप बसेल. महाराष्ट्रात कोणत्या गोदामातून किती धान्य निघाले आणि कोणत्या केंद्रावर पोहोचले, याची मिनिटागणिक डिजिटल माहिती थेट दिल्लीपर्यंत केंद्रीय यंत्रणेला रिअल-टाईम मिळत आहे.” ‘वन नेशन वन कार्ड’चा परप्रांतीयांनाही लाभ स्थलांतरित कामगार आणि इतर राज्यांतील नागरिकांसाठी असलेल्या सुविधेवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले. “केंद्र सरकारच्या ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्रात घेतला जात आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार किंवा देशातील कोणत्याही भागातून आलेला मजूर मुंबई, नाशिक किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात आपल्या मूळ रेशन कार्डवर मोफत धान्य मिळवू शकतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नागरिक चेन्नई किंवा बंगळुरूला गेला तरी त्याला तेथे धान्य मिळेल.” कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना आवाहन “आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये लाखो भाविक, साधू-संत आणि कामगार 15 दिवस ते 1-2 महिने वास्तव्यास येतील. या ‘फ्लोटिंग’ लोकसंख्येने नाशिकला येताना आपले मूळ रेशन कार्ड सोबत आणावे. ते कार्ड दाखवून त्यांना नाशिकमध्येही मोफत अन्नधान्याचा लाभ घेता येईल.” हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांना कडक इशारा योजनेच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांना बजावताना भुजबळ म्हणाले, “नाशिक जिल्ह्यात तब्बल 2,608 अधिकृत रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून सुमारे 39 लाखांपेक्षा अधिक पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरित केले जात आहे. नाशिकनंतर नागपूर आणि ठाणे या शहरांमध्येही ही अत्याधुनिक ‘धान्य एटीएम’ यंत्रणा वेगाने कार्यान्वित केली जाईल.” उद्घाटन झाले म्हणून यंत्रणा बंद पडू देऊ नका “उद्घाटन झाले, मंत्री आणि जिल्हाधिकारी निघून गेले की यंत्रणा बंद पडली, अशा तक्रारी आल्यास मी संबंधित अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरून जाब विचारीन. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव किंवा ज्यांना डिजिटल यंत्रणेची माहिती नाही, त्यांना मदत करण्यासाठी केंद्रावर कर्मचारी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मशिनमधील धान्यसाठा कधीही संपणार नाही, याची दक्षता पुरवठा विभागाने घेतली पाहिजे.” अन्नदान हे पुण्यकर्म; उपकार नव्हे, जनतेचा तो हक्क भुजबळ म्हणाले, “आपल्या संस्कृतीत अन्नदान हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. जरी आपण घरातून देत नसलो, तरी पात्र गरिबांपर्यंत शासनाचे अन्न सन्मानाने पोहोचवणे हे प्रत्येक अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. आम्ही जनतेवर कोणताही उपकार करत नसून मंत्रिमंडळाने आखलेल्या योजनेनुसार मोफत धान्य मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.” अर्थ खात्याच्या वादावर खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ खाते देण्याबाबतच्या चर्चेवर विचारले असता ते म्हणाले, “दुष्काळ निवारणाचा निधी, कर्जाचे व्यवस्थापन आणि काही तांत्रिक अडचणींमुळे मुख्यमंत्र्यांनी हे खाते सध्या स्वतःकडे ठेवले आहे. योग्य वेळी निर्णय होईल, त्यात कोणतीही अडचण नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी पत्रकार परिषद संपवली. ———————————————————————————— हेही वाचा… 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ, अधिकाऱ्यांनी ग्राउंडवर उतरावं!: आमदार दिलीप सोपल यांची प्रशासनावर टीका, मुळशीचे पाणी भीमा खोऱ्यात सोडण्याची मागणी “महाराष्ट्रात सध्या निर्माण झालेली परिस्थिती 1972च्या ऐतिहासिक दुष्काळापेक्षाही अधिक भीषण आणि भयानक आहे. जनावरांचा चारा, पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्याची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. अशा आणीबाणीच्या काळात वेगवेगळ्या पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून जनतेच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ वातानुकूलित दालनात बसून कागद नाचवणे आणि आश्वासनांची खैरात करणे बंद करावे; महसूल व पालिका यंत्रणेने प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरून काम केले तरच सामान्य माणसाला खरा दिलासा मिळेल,” असा रोखठोक इशारा बार्शीचे आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
अंगठा लावला की अवघ्या 35 सेकंदांत मिळणार 25 किलो धान्य:आता 24 तास रेशनिंगचे धान्य ATM सुरू; छगन भुजबळांची नाशिकमधून घोषणा