![]()
पुणे शहरातील व्यावसायिक आणि उद्योजकांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या कुख्यात बिश्नोई गँगच्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य गोळीबार करणाऱ्या दोघांसह एकूण ४ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तीन अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सलग १५ दिवस पाच राज्यांमध्ये पाच हजार किलोमीटरचा पाठलाग करत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य संशयित आणि प्रत्यक्ष गोळीबार करणारा आरोपी पवनकुमार याला तीन दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर दुसरा मुख्य आरोपी रविकुमार याला एका अल्पवयीन साथीदारासह पंजाबमधील भटिंडा येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच, या आरोपींना पुण्यात स्थानिक पातळीवर मदत करणाऱ्या सत्यप्रकाशलाही पोलिसांनी गजाआड केले आहे. हे आरोपी मूळचे हरियाणा आणि राजस्थानचे रहिवासी असून पूर्वी ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात एका स्टील कंपनीत काम करत होते. कामगिरीबद्दल पोलिस पथकाला ५ लाख बक्षीस गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त हसन गौहर यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकांनी ही मोहीम राबवली. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब अशा पाच राज्यांमध्ये १५ दिवस ही शोधमोहीम चालली. कामगिरीबद्दल पथकांना पाच लाखांचे बक्षीस जाहीर झाले. प्रेयसीचा मेसेज अटकेसाठी महत्त्वाचा धागा ठरला गुन्हा केल्यानंतर पसार झालेल्या पवनकुमारने प्रेयसीला एक मेसेज केला, तोच मेसेज महत्त्वाचा धागा ठरला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी पवनला पुण्यातून पकडले. दुसरीकडे, रविकुमार हा राजस्थानमधील पाकिस्तान सीमेलगतच्या गंगानगरचा रहिवासी असल्याने स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला भटिंडामधून शिताफीने पकडले.
Source link
पुण्यात बिश्नोई गँगचे खंडणी रॅकेट उद्ध्वस्त, चार गजाआड:पोलिसांकडून 5 राज्यांत 5 हजार किमी पाठलाग