Headlines

महाड मुख्याधिकारी मारहाण प्रकरण तापलं:अबू आझमींकडून 'सत्तेचा माज' आल्याची टीका, मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या- महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का




महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात झालेल्या कथित मारहाण प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. याप्रकरणी भाजप नगरसेवक सुरज बामणे, राकेश पाटील आणि अन्य एका व्यक्तीविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवर विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून कठोर कारवाईची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे महाड नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या दालनात कामकाज करत असताना भाजप नगरसेवक सुरज बामणे, राकेश पाटील आणि अन्य एक व्यक्ती तेथे पोहोचले. प्रभागातील विविध प्रश्नांवरून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत मुख्याधिकारी कोळेकर जखमी झाले. त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना मारहाण केली, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महाड शहर पोलिसांनी भाजप नगरसेवक सुरज बामणे, राकेश पाटील आणि अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 121(2), 221, 351(2), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर महाड नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अबू आझमींची टीका; ‘सत्तेचा माज आला’ या प्रकरणावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, “एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे मारहाण करणे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांविषयी जनतेची प्रतिमा खराब होत आहे. सरकारने या प्रकरणात कठोर कारवाई करावी. एखादी व्यक्ती भ्रष्टाचारात सहभागी असेल किंवा अधिकारी ऐकत नसतील, तर त्यांच्याविरोधात तक्रार करता येते, कायदेशीर कारवाई करता येते. मात्र कोणालाही मारहाण करण्याचा अधिकार नाही. सत्तेमुळे अहंकार आला असल्याचे दिसते. अशा प्रकारचे वर्तन कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नाही.” यावेळी समान नागरी संहिता (UCC) संदर्भातही त्यांनी मत व्यक्त करत, “यूसीसीमध्ये सार्वजनिक रस्त्यांवर लग्नाच्या मिरवणुका काढण्यास बंदी असावी आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही, असा नियम असायला हवा,” असे म्हटले. ‘महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का’ – मेघना बोर्डीकर राज्याच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांनीही या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. महाराष्ट्र हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी समन्वयाने व शहाणपणाने काम करणारे राज्य म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेसाठी निश्चितच चांगल्या नाहीत.” महाड मुख्याधिकारी मारहाण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, या घटनेवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *