![]()
विधान परिषदेत सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभागावरील चर्चेदरम्यान शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत संताप व्यक्त केला. दिव्यांग, अनाथ, एकल महिला आणि भिक्षेकरी यांच्या प्रश्नांकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप करताना त्यांनी, “कधी-कधी प्रश्न मांडण्यापेक्षा दोन कानफाडीत माराव्या वाटतात,” असे वक्तव्य केले. या विधानावर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी तत्काळ आक्षेप घेतला. त्यानंतर बच्चू कडूंनी दिलगिरी व्यक्त करत संबंधित शब्द रेकॉर्डवरून काढण्याची विनंती केली. दिव्यांग मंत्रालयाचे कौतुक, पण अंमलबजावणीवर नाराजी भाषणाच्या सुरुवातीलाच बच्चू कडू यांनी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात स्थापन झाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरापूर्वी दिलेल्या आदेशांची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिव्यांगांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव, विविध प्रलंबित मागण्या आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवायचे निर्णय एक वर्ष उलटूनही पुढे सरकले नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अवहेलना होत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “अधिकारी आदेश पाळत नसतील तर कारवाई मंत्रीवर करायची की सचिवावर?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दिव्यांगांसाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या बच्चू कडू यांनी दिव्यांगांसाठी दरमहा आर्थिक मदत, स्वतंत्र उद्योग व क्रीडा धोरण, अंत्योदय योजनेचा लाभ, बजेटमध्ये कायद्यानुसार 5 टक्के निधी, राष्ट्रीय व राज्यस्तरीय निधीची निर्मिती, आधुनिक इलेक्ट्रिक वाहनांचे वाटप, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर शिक्षणाची व्यवस्था आणि विविध सरकारी भरतींमध्ये अतिरिक्त गुण देण्याची मागणी केली. तसेच प्रत्येक आमदाराने आपल्या निधीतून दिव्यांगांसाठी किमान 30 लाख रुपये खर्च करावेत आणि प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभारावे, अशीही सूचना त्यांनी केली. ‘दोन कानफाडीत माराव्या वाटतात’; सभागृहात आक्षेप विशेष साहाय्य योजनेंतर्गत दिव्यांगांकडून आवश्यक नसलेली कागदपत्रे मागितली जात असल्याचा मुद्दा मांडताना बच्चू कडू यांनी संतापाच्या भरात, “कधी कधी प्रश्न मांडण्यापेक्षा दोन कानफाडीत माराव्या वाटतात,” असे वक्तव्य केले. यावर उपसभापती सचिन अहिर यांनी तत्काळ आक्षेप नोंदवत हे शब्द सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याची मागणी केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी लगेचच दिलगिरी व्यक्त करत, “मी सॉरी मागतो, चुकून शब्द आला,” असे म्हणत संबंधित शब्द रेकॉर्डवरून काढण्याची विनंती केली. भिक्षेकरी, अनाथ आणि एकल महिलांसाठीही उपाययोजनांची मागणी बच्चू कडू यांनी भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही उपस्थित केला. सध्या वापरल्या जाणाऱ्या कायद्यातील ‘भिक्षुक’ हा शब्द बदलण्याची गरज असल्याचे सांगत मंत्रालयासमोरही लहान मुले भीक मागताना दिसतात, मात्र त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत नसल्याची टीका त्यांनी केली. अनाथ मुला-मुलींसाठी २१ वर्षांनंतर निवासाची व्यवस्था नसल्याकडे लक्ष वेधत त्यांनी स्वतंत्र घरकुल योजना, आर्थिक सहाय्य आणि एलआयसीशी जोडलेली बचत योजना सुरू करण्याची मागणी केली. तसेच एकल महिलांसाठी पुनर्विवाह प्रोत्साहन योजना, त्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण आणि स्वतंत्र धोरण तयार करण्याचीही त्यांनी सूचना केली. आमदारांचाही सहभाग असलेली समिती स्थापन करण्याची सूचना महिला आणि सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित घटकांसाठी सरकारने स्थापन केलेल्या ३३ अधिकाऱ्यांच्या समितीसोबत लोकप्रतिनिधींनाही स्थान द्यावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. “आम्हीही जनतेत काम करतो, आमच्याकडेही अनुभव आहे. त्यामुळे आमदारांचीही एक समिती असावी,” असे ते म्हणाले. दिव्यांग, अनाथ, भिक्षेकरी आणि एकल महिलांच्या प्रश्नांवर सरकारने केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.
Source link
बच्चू कडूंचा सभागृहात संताप:'प्रश्न मांडण्यापेक्षा दोन कानफाडीत माराव्या वाटतात', सचिन अहिरांनी घेतला आक्षेप