Headlines

लाडकी-पिंपळखुटा-बोडना रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य:निकृष्ट कामामुळे नागरिक त्रस्त, अपघातांची भीती




मोर्शी प्रतिनिधी: लाडकी, पिंपळखुटा आणि बोडना गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शासनाकडून ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही, एका खासगी कंपनीने बांधलेल्या या रस्त्यावर माती आणि मुरमाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे या तिन्ही गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि मुरूम पसरला आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरून मोठे अपघात होण्याची भीती वाढली आहे. रस्ता बांधताना संबंधित कंपनीने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या रस्त्यावरून लाडकी, पिंपळखुटा लहान आणि बोडना येथील शेकडो नागरिक दररोज ये-जा करतात. रस्त्यावरील घसरणीमुळे आणि मुरमाच्या खड्यांमुळे वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले आहे. अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले असून, काहींना गंभीर दुखापतही झाली आहे. शाळकरी विद्यार्थी, वृद्ध महिला-पुरुष आणि आजारी रुग्णांनाही या रस्त्यावरून ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदार आणि कंपनीच्या या ढिसाळ कारभारामुळे सामान्य जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या कामाची त्वरित चौकशी करण्याची आणि संबंधित कंपनीला नोटीस बजावून रस्ता पुन्हा बांधण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास, रस्त्यावर बसून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *