Headlines

Congress Demands PM Modi Break Silence on Ram Mandir Donation Scam; Probe by Supreme Court


अयोध्या येथील श्रीराम मंदिर कथित देणगी घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडावे आणि दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केंद्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय मीडिया पॅनलिस्ट पंखुडी पाठक यांनी रविवारी केली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्य

.

पंखुडी पाठक यांनी सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या नावावर राजकारण करून भाजपने केंद्र आणि अनेक राज्यांमध्ये सत्ता मिळवली. मात्र, संपूर्ण देशाच्या आस्थेचा विषय असलेल्या श्रीराम मंदिरातील दानपेटी व देणगीत कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. पुरावे उपलब्ध असूनही अद्याप दोषींवर ठोस कारवाई झाली नाही किंवा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे त्यांनी नमूद केले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार, अयोध्येतील कथित गैरव्यवहाराप्रकरणी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या जनजागृती मोहिमेचा पहिला टप्पा म्हणून छत्रपती संभाजी नगर येथील सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत पाठक बोलत होत्या.

यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार नामदेव पवार, प्रदेश पदाधिकारी प्रकाश मुगदिया, राजेश मुंढे, अशोक डोळस, मोहन देशमुख, इब्राहिम पठाण, भाऊसाहेब जगताप, इंजि. विशाल बन्सवाल, ऋषिकेश महाजन, सय्यद आबेद हुसैन, मोहम्मद जाकेर यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाठक यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना पंतप्रधानांच्या देखरेखीखाली झाली असताना या कथित घोटाळ्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? जर सर्व काही पारदर्शक होते, तर ट्रस्टचे तत्कालीन महासचिव चंपत राय आणि ट्रस्टी अनिल मिश्रा यांच्यावर राजीनाम्याची वेळ का आली?”

काँग्रेसने या प्रकरणी काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये राम मंदिर ट्रस्टची स्थापना, प्रशासकीय देखरेख आणि आर्थिक पारदर्शकतेबाबत पंतप्रधानांनी देशासमोर भूमिका स्पष्ट करावी; संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र आणि निष्पक्ष फॉरेन्सिक ऑडिटसह चौकशी व्हावी; तसेच सध्याचा वादग्रस्त ट्रस्ट तात्काळ बरखास्त करून धर्माचार्य, प्रशासकीय तज्ज्ञ आणि स्वतंत्र सदस्यांचा नवीन, पारदर्शक ट्रस्ट स्थापन करावा, या मागण्यांचा समावेश आहे.

पाठक यांनी सांगितले की, रामाच्या नावाने जमा झालेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब देशातील जनतेला मिळालाच पाहिजे. श्रद्धेच्या नावावर झालेल्या या कथित लुटीतील दोषींना संरक्षण न देता त्यांना कायद्यापुढे उभे करणे हीच खरी रामभक्ती आहे. काँग्रेस या मागण्यांसाठी सातत्याने देशव्यापी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *