![]()
हिंगोली तालु्क्यातील घोटा शिवारात कयाधू नदीच्या पात्रात बैलजोडी धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून करुण अंत झाल्याची घटना रविवारी ता. 12 रात्री उघडकीस आली आहे. दोघांवर शोकाकुल वातावरणात घोटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या घटनेमुळे घोटा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेची नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटा येथील कृष्णा बालाजी अटक (16) व त्याचा मित्र गणेश उर्फ बंटी अर्जुन पावडे (16) हे दोघे रविवारी ता. 12 दुपारी बैलजोडी धुण्यासाठी तसेच शेळ्या चारण्यासाठी कयाधू नदीच्या परिसरात गेले होते. दुपारच्या सुमारे कयाधू नदीच्या पात्रात खोल खड्डा असलेल्या भागातील पाण्यात दोघेही उतरले. यावेळी दोघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. मात्र पाण्यावर येण्याच्या प्रयत्नात ते खड्ड्यातील गाळात अधिकच फसल्या गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, सायंकाळी शेळ्या घरी आल्या अन दोघेही घरी आले नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. यावेळी गावकऱ्यांनी कयाधू नदीच्या पात्रातील खड्यात पाहणी केली असता दोघांचे मृतदेह गाळात फसल्याच्या स्थितीत आढळून आले. गावकऱ्यांनी दोघांचेही मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी हंबरडाच फोडले. यामुळे परिसरातील वातावरण धिरगंभीर झाले होते. दरम्यान, घटनास्थळी पोलिस पोहोचण्यापुर्वीच त्यांच्या कुटुंबियांनी दोघांचेही मृतदेह घरी नेले होते. त्यानंतर रात्री उशीरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. मयत कृष्णा हा नुकताच दहावी पास झाला होता. त्याने हिंगोली तालुक्यातील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. तसेच मयत बंटी उर्फ गणेश याच्या पश्चात आई, वडील दोन भाऊ असा परिवार असल्याचे सांगण्यात आले आहे. बंटी हा देखील नुकताच दहावी पास झाला होता. या घटनेची नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.
Source link
हिंगोलीत काळाचा घाला:कयाधू नदीपात्रात बैलजोडी धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून करुण अंत