![]()
“नीट (NEET) पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, पण सरकारला इतर पक्ष फोडण्यातून वेळ मिळत नाही. जंतरमंतरवर सोनम वांगचुक आणि युवक करत असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे,” अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी आज मांडली. ‘मातोश्री’वर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकार, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, आगामी संसद अधिवेशनात या मुद्द्यावर आवाज उठवणार असल्याचे सांगत त्यांनी सर्वपक्षीय खासदारांना माणुसकीची आठवण करून देत या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे भावनिक आवाहन केले आहे. ‘सोनम वांगचुक यांना उपोषण सोडण्याची विनंती केली, पण सरकार असंवेदनशील’ लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “सोनम वांगचुक यांचे गेल्या 16 दिवसांपासून प्राणांतिक उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती वेगाने खालावत आहे. चार दिवसांपूर्वी मी खासदार अरविंद सावंत यांना त्यांच्या भेटीसाठी पाठवले होते. मी स्वतः वांगचुक यांच्याशी फोनवर बोलून उपोषण सोडण्याची विनंती केली. पण सरकारला अशा व्यक्ती स्वतःहून संपत असतील, तर तेच हवे आहे, असे नाईलाजाने म्हणावे लागते.” ते म्हणाले, “2018 साली गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी जी. डी. अगरवाल यांनी 115 दिवस उपोषण केले, त्यात त्यांचे प्राण गेले. पण सरकारने दखल घेतली नाही. आज वांगचुक यांचीही तीच अवस्था सरकार करत आहे.” ‘धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही?’ नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, “एखाद्या व्यक्तीकडून एखादे काम नीट होत नसेल आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य बरबाद होत असेल, तर त्या व्यक्तीला बदलायला काय हरकत आहे? शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन तिथे एखाद्या सक्षम व्यक्तीची नियुक्ती केली, तर यात सरकारला कमीपणा का वाटतो?” “पालकांनी आयुष्याची पुंजी लावून मुलांना शिकवले, पण एका पेपरफुटीमुळे सर्व बरबाद झाले. पेपरफुटीचे सर्वाधिक धागेदोरे आणि अटका महाराष्ट्रात झाल्या आहेत. तरीही सरकारला याची चिंता नाही. ते परदेशात फिरण्यात आणि भाडोत्री लोक आणून स्वतःचे स्वागत करून घेण्यात मग्न आहेत.” ‘खासदारांनो, तुमच्यात माणुसकी शिल्लक असेल तर समर्थन द्या!’ संसदेच्या आगामी अधिवेशनाबाबत आणि राज्यसभेतील खासदारांना उद्देशून उद्धव ठाकरे यांनी एक अत्यंत भावनिक आणि थेट आवाहन केले. संसदेचे अधिवेशन 20 तारखेला सुरू होत आहे. आमचे खासदार हा प्रश्न संसदेत उचलतीलच. पण मी सर्व पक्षांच्या, अगदी भाजपच्या खासदारांनाही आणि राज्यसभेतील सदस्यांना उद्देशून सांगतो की, “मी तुम्हाला सवाल विचारत नाहीये, तर विनंती करत आहे. जर तुमच्यात थोडीशी तरी माणुसकी (इंसानियत) बाकी असेल, तर कृपया या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तुमचे समर्थन द्या.” ‘राहुल गांधी आणि सर्व नेत्यांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून एकत्र यावे’ या आंदोलनाला राजकीय स्वरूप न देता सर्वपक्षीय पाठिंब्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. “हा देशाच्या युवकांचा प्रश्न आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनीही त्या व्यासपीठावर जावे. मी स्वतः वेळ पडल्यास तिथे जाईन. ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव या सर्वांनी आपापल्या राज्यांत आणि शहरांत या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरावे. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता सुरू आहे. प्रस्थापित नेत्यांवरून युवकांचा विश्वास उडाला असेल, पण आम्ही त्यांच्यासोबत आहोत हे दाखवून देण्याची वेळ आली आहे.” आंदोलनात गुंड सोडण्याचा डाव; ‘अभिजीत दीपके’ला धोका जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारा युवक ‘अभिजीत दीपके’ याच्या दाव्याचा संदर्भ देत ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. “अभिजीत दीपकेने दावा केला आहे की, २० तारखेच्या आत या आंदोलनात गुंड घुसवून हिंसाचार माजवून हे आंदोलन उधळून लावण्याचा काही जणांचा डाव आहे. हे अत्यंत नीच आणि हिणकस वृत्तीचे लक्षण आहे. संपूर्ण देशाने या युवकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.” 18 तारखेला नागपुरात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरुवातीला ठाकरे यांनी दादर येथे झालेल्या ‘महाआरती’चा संदर्भ दिला. “हिंदुत्वाचा दुरुपयोग करून जो लुटीचा कार्यक्रम सुरू आहे, त्याविरोधात आम्ही दादरला आंदोलन केले. येत्या १८ तारखेला नागपुरात हा कार्यक्रम होईल आणि मी स्वतः तिथे जाणार आहे. हिंदूंनी आता झोपून चालणार नाही, कोणी आपल्याला लुटत असेल तर जागे झाले पाहिजे,” असा इशाराही त्यांनी दिला.
Source link
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही?:सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा; मोदी सरकारवर सडकून टीका