Headlines

सीओईपी वसतिगृह प्रकरणी 100 ते 150 जणांवर गुन्हा:पत्रकार मंदार गोंजारी यांचे नाव समाविष्ट, पत्रकार संघाचा आक्षेप




सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वसतिगृह परिसरात विनापरवानगी प्रवेश करून घोषणाबाजी केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एनएसयूआय आणि काँग्रेसच्या सुमारे १०० ते १५० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाच्या एफआयआरमध्ये ‘एबीपी माझा’चे पत्रकार मंदार गोंजारी यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याने पुणे श्रमिक पत्रकार संघाने तीव्र आक्षेप घेतला आहे. सीओईपीच्या वसतिगृह विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजू तुकारामजी पाचकोर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. हा प्रकार २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.४५ ते रात्री ९.४५ या वेळेत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीनुसार, विद्यार्थिनीच्या प्रवेश व शुल्कासंबंधीच्या विषयावरून काही जणांनी तिचा व्हिडिओ तयार करून प्रसारित केला. हा व्हिडिओ दबाव टाकून तयार करण्यात आल्याने विद्यापीठाची बदनामी झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यानंतर एनएसयूआय व काँग्रेसशी संबंधित कार्यकर्ते वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ जमले. त्यांनी सुरक्षारक्षकांना धमकावून प्रवेशद्वार उघडले, परिसरात प्रवेश केला, घोषणाबाजी केली आणि प्रशासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप एफआयआरमध्ये आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९०, १९१(२), ३२९(३), ३५१(२), ३५२ आणि ३५६(२), तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३७(३) व १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कलमे बेकायदा जमाव, दंगल, विनापरवानगी प्रवेश, धमकी आणि अपमानाशी संबंधित आहेत. दरम्यान, पुणे श्रमिक पत्रकार संघाने दावा केला आहे की, पत्रकार मंदार गोंजारी हे घटनेच्या वेळी महाविद्यालयात उपस्थित नव्हते. वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराचे नाव कोणतीही पडताळणी न करता गुन्ह्यात समाविष्ट करणे हे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे असल्याचे संघटनेने म्हटले आहे. गोंजारी यांचे नाव एफआयआरमधून वगळण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. या प्रकरणातील सर्व आरोप तपासाधीन असून, शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *