![]()
गणेशोत्सव आणि अन्य मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या कर्णकर्कश्य डीजे आणि डॉल्बीवर कायद्याने घालून दिलेल्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी करणार की नाही, याबाबत पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने (आप) केली आहे. ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असताना लोकप्रतिनिधींनी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत संदिग्ध भूमिका घेऊ नये, असे पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे. किर्दत यांनी महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि महापौरांना पत्र पाठवून कर्णकर्कश्य ध्वनिवर्धकांवर कारवाईची मागणी केली आहे. गणेश मंडळांसोबत झालेल्या बैठकीत याबाबत स्पष्ट भूमिका घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. महापौरांनी सोशल मीडियावर ‘माझ्या कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही’ अशी भूमिका घेतल्याचा उल्लेख करत किर्दत यांनी त्यावर आक्षेप नोंदवला. देशातील ध्वनी प्रदूषण नियमांनुसार विविध भागांसाठी ध्वनीची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली असून, त्याची अंमलबजावणी करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना कर्णकर्कश्य आवाजाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याबरोबरच कानासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. सर्व धर्मांचे सण उत्साहात साजरे व्हावेत; मात्र त्यासाठी पारंपरिक वाद्ये आणि सांस्कृतिक साधनांचा वापर करावा, अशी भूमिका ‘आप’ने मांडली आहे. पुण्याचा गणेशोत्सव हा सजावट, पारंपरिक वादन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध आहे. मोठ्या डीजे-डॉल्बी आणि अश्लील नृत्यासाठी नागरिक पुण्यात येत नाहीत, असे किर्दत यांनी म्हटले आहे. आम आदमी पार्टीने महापौरांनी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत स्पष्ट स्पष्टीकरण द्यावे, तसेच पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त कर्णकर्कश्य ध्वनिवर्धकांविरोधात नेमकी कोणती कारवाई करणार, हे जनतेसमोर जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.
Source link
'आप'ची महापौरांना मागणी: डीजे-डॉल्बीवर स्पष्ट भूमिका जाहीर करा:कायदा पाळणार की कार्यकर्त्यांना वाचवणार, पुणेकरांना सांगा- मुकुंद किर्दत