![]()
लासूरगाव, लासूर स्टेशन, सावंगी, देवळी, माळीवाडगाव, डोणगाव परिसरात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या कोळपणी व तण नियंत्रणाच्या कामांना वेग दिल्याने शेतीशिवारामध्ये हे चित्र दिसून येत आहे. मागील आठवडाभर झालेल्या संततधार रिमझिम पावसामुळे शेतांमध्ये कापूस, मका, तूर, मूग व भुईमूग या पिकांसोबत मोठ्या प्रमाणात तण वाढले होते. मात्र गुरुवारपासून सोमवारपर्यंत पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे हाती घेतली असून शेतांमध्ये कोळपणीची लगबग सुरू आहे. सध्या परिसरातील खरीप पिकांची वाढ समाधानकारक असून, वेळेवर कोळपणी व तण नियंत्रण झाल्याने पिकांची वाढ अधिक चांगली होण्यास मदत होणार आहे. आगामी काळात पिकांच्या गरजेनुसार समाधानकारक पाऊस झाल्यास यंदाच्या खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आणखी आठवडाभर पाऊस लांबलाच तर उगवण झालेली पिके धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण होईल, अशी खंत लासूरगाव येथील शेतकरी भाऊसाहेब गोंडे यांनी व्यक्त केली.
Source link
लासूर स्टेशन परिसरात पिके उगवली; शेतकरी कोळपणीच्या कामात व्यग्र