Headlines

कन्नडचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना मारहाणीच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन:आरोपी कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्याची मुख्याधिकारी संघटनेची मागणी




नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी रवींद्र लांडे यांच्यावर शनिवारी सायंकाळी पाच वा. नगर परिषदेच्या एका कर्मचाऱ्याने व त्याच्या नातेवाइकांनी मारहाण केली. याप्रकरणी मुख्याधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन सोमवारी निषेध व्यक्त करण्यात आला. संबंधित कर्मचारी व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी केली. या संदर्भात राज्य मुख्याधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना मनपा उपायुक्त तथा मुख्याधिकारी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर भोंबे, वैजापूरचे मुख्याधिकारी बी. यु बिघोत, मनपा उपआयुक्त विकास नवाळे, खुलताबादचे मुख्याधिकारी समीर शेख, पैठण मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, गंगापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कन्नड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे हे शनिवारी एसआयआर निवडणूक विषयक काम करत असताना पालिका कर्मचारी प्रदीप अल्हाट, त्याची आई शकुंतलाबाई, पत्नी, बहीण, कल्पना अल्हाट आणि साला पंकज सुरवसे यांनी त्यांच्या वाहनाला अडवून रस्त्यात शिवीगाळ करून धक्काबुक्की करत मारहाण केली. शासकीय अधिकारी, कर्मचारी हे संविधानाने सोपवलेले कर्तव्य पार पाडत असताना त्यांच्यावर होणारे हल्ले प्रशासनाचे मनोबल खच्चीकरण करणारे असून अशा घटनांना वेळेत आणि कठोर प्रतिसाद मिळाला नाही तर अशा घटनांना प्रोत्साहन मिळेल. या घटनेचा वेगवान, नि:पक्ष व पारदर्शक तपास करून संबंधित आरोपींवर लागू असलेल्या कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. शासकीय सेवकावर हल्ला करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, धमकी देणे व निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणे या सर्व बाबींचा समावेश करून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. यावेळी या शिष्टमंडळाशी चर्चा करून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्याची कारवाई करत असल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे विविध सेवा ठप्प कन्नड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याने मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या मारहाणीच्या निषेधार्थ अधिकारी, कर्मचारी यांनी निषेध नोंदवून काम बंद ठेवले. त्यामुळे कन्नड शहरातील पथदिवेही चालू न केल्याने शहर अंधारात बुडाले आहे. नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक प्रशांत देशपांडे, नीलेश शिंदे, राहुल करडे, पवन परदेशी, गोपाल घावरी, रितेश बेद, प्राजक्ता शेजवळ, विष्णू राठोड, दामोदर तायडे, वसुली कर्मचारी सागर शेख, मुमताज अली, बनकर, बाजीराव थोरात, संजय सोनार हे सर्व कर्मचारी नगर परिषदेच्या प्रांगणात जमून त्यांनी या मारहाणीचा निषेध निषेध केला व तहसीलदार सारिका भगत, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांना निवेदन सादर करून संबंधित कर्मचाऱ्यास बडतर्फ करण्याची मागणी केली. या काम बंद आंदोलनामुळे नगरपालिकेची वसुली, स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा यावर परिणाम झाला. शहरातील पथदिवे न लावल्याने शहर अंधारात बुडाले आहे, अशी माहिती श्रीकृष्ण बडक यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *