Headlines

नांदगाव आगाराला जूनमध्ये 5.78 लाखांचा नफा:विभागातील 13 आगारांत एकमेव नफ्यातील आगार ठरण्याचा मान




नांदगाव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदगाव आगाराने जून २०२६ अखेर ५ लाख ७८ हजार रुपयांचा नफा मिळवत नाशिक विभागातील १३ आगारांमध्ये एकमेव नफ्यातील आगार ठरण्याचा मान मिळवला आहे. सातत्यपूर्ण नियोजन, कर्मचाऱ्यांचे योगदान आणि प्रवाशांचा वाढता प्रतिसाद यामुळे आगाराने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नांदगाव आगाराकडे सध्या ५२ बसेस असून दररोज सुमारे ३१० फेऱ्या आणि १६,५६० किलोमीटर धाव घेतली जाते. जून महिन्यात आगाराचे उत्पन्न ३ कोटी ३१ लाख रुपये झाले, तर खर्च ३ कोटी २४ लाख ८८ हजार रुपये राहिल्याने ५.७८ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. महिनाभरात सुमारे ६ लाख ४५ हजार प्रवाशांनी आगाराच्या बससेवेचा लाभ घेतला. सावरगाव, चाळीसगाव, मालेगाव, येवला या ग्रामीण मार्गांसह नाशिक, संभाजीनगर, पुणे, जालना, माहूरगड आणि जळगाव या लांब पल्ल्याच्या मार्गांवरही प्रवाशांची चांगली गर्दी असल्याने उत्पन्नात भर पडत आहे. आगारात ८१ वाहक, ७९ चालक, ३० चालक-वाहक, २८ कार्यशाळा कर्मचारी आणि १५ प्रशासकीय कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे मागील चार ते पाच वर्षांपासून आगार सातत्याने नफ्यात आहे. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन, नियोजनबद्ध ड्युटी व्यवस्था तसेच इंधन बचतीसाठी चालकांना दिलेले मार्गदर्शन यामुळे कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. दरम्यान, आगारात यापूर्वी १० नवीन बीएस-६ बस दाखल झाल्या असून शनिवारी आणखी पाच नवीन ‘जिजाऊ’ (३ बाय २) बस आगारात दाखल झाल्याने प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा मिळणार आहे.आगार व्यवस्थापनाने प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि दर्जेदार सेवा देण्यावर भर दिला असून आगामी काळातही उत्पन्नवाढीसह नफ्याची परंपरा कायम राखण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नांदगाव बस स्थानकावर प्रवाशांची वर्दळ असते सुविधांमुळे प्रवासी वाढले आमदार सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याने नांदगाव आगाराला १५ नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत. तसेच त्यांच्या प्रयत्नामुळे बस स्थानक परिसरात काँक्रिटीकरण झाल्याने हा परिसर सुशोभित झाला आहे. चांगल्या सुविधा आणि प्रवास सुखकर होत असल्याने येथील प्रवासी संख्या वाढल्याची माहिती आगार व्यवस्थापनाने दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *