![]()
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रद्द करावी आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी, या दोन प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केले. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने या आंदोलनाची हाक दिली होती. शाळेत अध्यापन आणि शिक्षक दिनाचे कार्यक्रम सुरू असतानाच हे आंदोलन करण्यात आले. राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार नेहमी दुर्लक्ष करते, असा आरोप या संघटनेने केला आहे. या धोरणाच्या निषेधार्थ जिल्हाभरातील शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी २०१० पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीमधून पूर्ण सूट द्यावी, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, टीईटीमुळे प्रभावित सेवांतर्गत शिक्षकांना कायदेशीर आणि धोरणात्मक संरक्षण द्यावे, आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी योग्य दिलासा द्यावा, अशा घोषणाही काही ठिकाणी देण्यात आल्या. शिक्षक दिनासारख्या दिवशी उत्सव साजरा करण्याऐवजी शिक्षकांना काळ्या फिती लावून निषेध नोंदवावा लागणे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे शासनाने शिक्षकांच्या लोकशाही मार्गाने नोंदवलेल्या निषेधाची दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. अमरावती जिल्ह्यात राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील, जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी, सरचिटणीस सुभाष सहारे, कार्याध्यक्ष संजय साखरे, कोषाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष, सरचिटणीस आणि शिक्षकांनी काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग घेतला. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) ची सेवांतर्गत शिक्षकांवरील सक्ती रद्द करणे आणि जुनी पेन्शन योजना (ओपीएस) पूर्ववत लागू करणे, या प्रमुख मागण्यांसाठी हे निषेध आंदोलन करण्यात आले. शासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्यास संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान दिल्लीत मोर्चा काढला जाईल. ६ ते ९ ऑक्टोबर या काळात दिल्लीच्या जंतर-मंतर येथे साखळी धरणे आंदोलनही केले जाईल, असे संघटनेचे राज्य अध्यक्ष देविदास बस्वदे, वरिष्ठ उपाध्यक्ष किरण पाटील, सरचिटणीस कल्याण लवांडे, जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी, सरचिटणीस सुभाष सहारे आणि कार्याध्यक्ष संजय साखरे यांनी कळवले आहे.
Source link
शिक्षक दिनी शिक्षकांचे काळ्या फिती लावून काम:टीईटी रद्द करा आणि जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी आंदोलन