![]()
लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल या तरुणाची हत्या केल्याच्या बहुचर्चित प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. रितेश हिंगे असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून तो मुख्य आरोपी चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचा वर्गमित्र असल्याची माहिती समोर आली आहे. हत्येच्या कटाची माहिती रितेशला आधीपासून होती, मात्र त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली नसल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात यापूर्वी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली होती. आता रितेश हिंगेच्या अटकेमुळे या प्रकरणात आरोपींची संख्या तीन झाली आहे. रितेशला वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. व्हॉट्सॲप चॅटमधून पोलिसांना धागा तपासादरम्यान चेतन चौधरी आणि रितेश हिंगे यांच्यातील व्हॉट्सॲप संभाषण पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, रितेशने हे संभाषण डिलीट केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून डिलीट केलेले चॅट रिकव्हर केले. या संभाषणातून केतनच्या हत्येच्या कटाबाबत रितेशला काही माहिती होती का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. पोलिसांच्या तपासानुसार, 18 जून रोजी चेतन आणि सियाने रितेशलाही लोहगडावर सोबत येण्यास सांगितलं होतं. मात्र, रितेशने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर लोहगडावर नेमकं काय घडलं, याची माहिती त्याला होती का आणि हत्येनंतर आरोपींशी त्याचा नेमका किती संपर्क होता, याचा तपास आता केला जात आहे. हत्येनंतरही रितेशचा चेतन आणि सियासोबत संपर्क असल्याचं तपासात समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे हत्येपूर्वी आणि हत्येनंतर झालेल्या संभाषणांचा तपास पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. रितेश हिंगे कोण आहे रितेश हिंगे हा चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचा वर्गमित्र असल्याची माहिती आहे. तो मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी कंपनीत काम करत असल्याचं समोर आलं आहे.पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, केतनच्या हत्येच्या कटाबाबत रितेशला काही माहिती होती. मात्र, त्याने हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला नाही, असा संशय आहे. याच पार्श्वभूमीवर त्याची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. रितेशचा या हत्येत थेट सहभाग होता का, त्याला कटाची नेमकी किती माहिती होती आणि त्याने आरोपींना कोणत्याही प्रकारे मदत केली का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. नेमकं काय घडलं होतं? 18 जून 2026 रोजी लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालची हत्या झाल्याचा आरोप आहे. केतनचं सिया गोयलसोबत लग्न ठरलं होतं. दोघांचा साखरपुडा झाला होता आणि नोव्हेंबरमध्ये त्यांचं लग्न होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, पोलिसांच्या तपासानुसार सियाचे चेतन चौधरीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधात केतन अडथळा ठरत असल्याने त्याला संपवण्याचा कट रचल्याचा आरोप सिया आणि चेतनवर आहे. 18 जून रोजी सियाने केतनला वाढदिवसाच्या निमित्ताने ट्रेकिंगसाठी लोहगडावर नेलं. त्यानंतर चेतनही तिथे पोहोचला. लोहगडावर गेल्यानंतर केतनला कड्यावरून ढकलण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचं भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. केतनचा पाय घसरल्यामुळे तो दरीत पडल्याचं सांगण्यात आलं. मात्र, पोलिसांच्या तपासात या कथित अपघाताबाबत संशय निर्माण झाला. सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडा लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. या फुटेजमध्ये चेतन चौधरी दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सुरू केला. तपास पुढे गेल्यानंतर सिया आणि चेतन यांच्यावर संशय बळावला आणि दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान केतनच्या हत्येमागे त्यांच्या प्रेमसंबंधांचा मुद्दा असल्याचं समोर आलं. सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघेही न्यायालयीन कोठडीत असून त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू असल्याची माहिती आहे. आता रितेशच्या चौकशीत काय समोर येणार? केतनच्या हत्येला 79 दिवस उलटल्यानंतर रितेश हिंगेच्या अटकेमुळे तपासाला नवी दिशा मिळाली आहे. रितेशला कटाची माहिती नेमकी कधी मिळाली, त्याने चेतन आणि सियाला कोणती मदत केली का, हत्येपूर्वी त्यांच्यात काय चर्चा झाली आणि हत्येनंतर त्यांच्यात कोणता संपर्क झाला, या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, डिलीट केलेल्या व्हॉट्सॲप चॅटमधून मिळालेली माहिती या तपासात महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे रितेशच्या चौकशीनंतर केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. नवी मुंबईत 15 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप:20 वर्षीय तरुणाविरोधात पॉक्सोसह बलात्काराचा गुन्हा उरण परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उरण पोलिसांनी २० वर्षीय तरुणाविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. शुभम म्हात्रे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून तो महाविद्यालयीन शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.सविस्तर वाचा..
Source link
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला 79 दिवसांनी मोठं वळण:चेतनच्या मित्राला अटक, व्हॉट्सॲप चॅटमधून धागा