![]()
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकरी प्रश्न, महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवरून राज्य सरकार तसेच भाजपवर जोरदार टीका केली. “राम मंदिरावर थेट दरोडा पडला आहे. केवळ नाराजी व्यक्त करून काही होणार नाही,” असे म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थेट लक्ष्य केले. मराठवाड्यातील काँग्रेसच्या संघटनात्मक आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भूमिका मांडली. राम मंदिरावरील कथित दरोडा आणि संघावर टीका राम मंदिर उभारणीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. यावर सपकाळ म्हणाले, “हा केवळ एका कोषाध्यक्षाचा घोटाळा नसून संपूर्ण विश्वस्त मंडळाचा यात सहभाग आहे. आधी अभिमानाने सांगायचे की विश्वस्त मंडळात संघाचे लोक आहेत. आता थेट राम मंदिरावर ‘दरोडा’ पडल्यानंतर संघ केवळ नाराजी व्यक्त करत आहे, हे हास्यास्पद आहे. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हिंमत असेल, तर त्यांनी या प्रकरणातील सर्व संबंधितांना तत्काळ निष्कासित करून दाखवावे.” शेतकऱ्यांची फसवणूक आणि बोगस सरकार एल निनोमुळे दुष्काळ पडणार याचा अंदाज आधीच होता. तरीही सरकारने कोणतीही पूर्वतयारी केली नाही, असा आरोप त्यांनी केला. “राज्यात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट आहे. हे सरकारच बोगस आहे. कर्जमाफीच्या नावाखाली प्राप्तिकर विभागाची यादी मागवून वेळकाढूपणा केला जात आहे. सरकारमधील एका मंत्र्यानेच ही यादी उशिरा पाठवण्याचे निर्देश दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे,” असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला. ‘गँग ऑफ ट्रिपल इंजिन’ सरकार राज्यातील सत्तेच्या समतोलावर भाष्य करताना ते म्हणाले की, सत्तेतील राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात मोठी धुसफूस सुरू आहे. हे ट्रिपल इंजिन सरकार नसून ‘गँग ऑफ ट्रिपल इंजिन’ आहे आणि आता त्यांच्यात टोळीयुद्ध सुरू झाले आहे. अजित पवार गटात सर्व काही आलबेल नसून लवकरच हा पक्ष फुटल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल, असा दावाही त्यांनी केला. शरद पवारांच्या NDA प्रवेशाचे खंडन शरद पवार एनडीएमध्ये जाणार या केवळ वावड्या असून, सुप्रिया सुळे यांनी या चर्चांचे स्पष्टपणे खंडन केले असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. मुंबईतील विकासकामे आणि स्मारके मुंबईला चारही बाजूंनी प्रवेशद्वार बनवण्याची सरकारची घोषणा ही केवळ स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी केलेली धूळफेक आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अद्याप पूर्ण झालेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राहुल गांधींच्या भूमिकेचे समर्थन उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा दिल्याबाबत विचारले असता सपकाळ म्हणाले की, काँग्रेस आधीपासूनच बेरोजगारी, नीट परीक्षा, यूपीएससी आणि विविध लोकसेवा आयोगांमधील कथित गैरव्यवहारांच्या विरोधात आंदोलन करत आहे. ‘छात्रों की गूंज’सारख्या अभियानातून काँग्रेस युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘2029 मध्ये राहुल गांधींचे मोठे आव्हान’ राहुल गांधींवरील भाजपच्या टीकेबाबत प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले की, भाजपला प्रत्येक ठिकाणी राहुल गांधीच दिसतात. यावरूनच भाजपसमोर सर्वात मोठे राजकीय आव्हान राहुल गांधी असल्याचे स्पष्ट होते. “2029च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात परिवर्तन घडेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दुष्काळाची शक्यता, शेतकरी कर्जमाफी, राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि महायुतीतील राजकीय घडामोडी या मुद्द्यांवर सध्या राजकीय वातावरण तापले आहे. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसने संघटन विस्ताराबरोबरच जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले असून, हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकार आणि भाजपवर अनेक मुद्द्यांवरून थेट हल्लाबोल केला. संबंधित बातमी वाचा… एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार:’ऑपरेशन टायगर’नंतर शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा, भाजप नेत्यांच्या घेणार भेटी ‘ऑपरेशन टायगर’च्या यशस्वीतेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची चर्चा आहे. या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची भेट झाली होती. त्यानंतर आता शिंदे दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी कॅबिनेट मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगलेली असतानाच हा दौरा होत असल्याने राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे सध्या मुंबईत असून ते दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहणार आहेत, त्यानंतर अशी माहिती आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
थेट राम मंदिरावर दरोडा, संघाची नाराजी हास्यास्पद:हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; 'गँग ऑफ ट्रिपल इंजिन' सरकार म्हणत केले लक्ष्य