![]()
शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारी आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसान करणारी ‘अमेरिकन डील'(करार) केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात उपविभागीय
.
पंतप्रधानांना पाठवलेल्या संयुक्त निवेदनात प्रामुख्याने शेती आणि शेतकरी हिताच्या तीन अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्यांवर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी ‘अमेरिकन डील’ किंवा तत्सम करारांना कोणतीही मान्यता देऊ नये. त्याऐवजी आगामी पावसाळी अधिवेशनात देशातील सर्व शेतमालाला कायदेशीर संरक्षण देणारा ‘हमीभाव (एमएसपी) कायदा’ तातडीने पारित करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, पीकविम्याच्या मुद्द्यावरही शेतकऱ्यांनी लक्ष वेधले आहे.
२०२६ च्या पीकविमा योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे असलेले जुने ‘तीन ट्रिगर’ (नुकसान भरपाईचे निकष) पुन्हा समाविष्ट करण्यात यावेत. सध्याच्या अटींमुळे विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत असून, नुकसान होऊनही भरपाई मिळत नसल्याची संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
तसेच, रानडुकरे, रोही यांसारख्या वन्यप्राण्यांमुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पिकांचे रक्षण करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर शेताभोवती तार कुंपण करण्याची योजना त्वरित लागू करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या संयुक्त आंदोलनात निवेदन सादर करताना राजू वानखडे, अरुण बोंडे, पंकज वानखडे, श्रीकृष्ण भाऊ गुल्हाने, किसान ब्रिगेडचे धनंजय मिश्रा, भगवंत गवळी, निखिल सांगोले, कैलास साबळे, गुलाबराव म्हसाये, संदीप ढोरे, मनोहर ताकतोडे, दिगंबर बंगाले, अनिल देवगीकर, जगदीश जोगळे, नंदकिशोर बबानिया, मुन्ना नाईक नवरे, प्रफुल्ल मालदुरे, योगेश सोळंके, विजू मोहोड, सुभाष मोरे, अजय हांडे, विलास गाडेकर, राजू टिपरे, प्रमोद खेडकर, मिलिंद वानखडे, विनय भडांगे, उमेश पाटील ठाकरे, प्रमोद सपकाळ, प्रवीण तिरकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
महावितरण कार्यालयावर धडक
प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक वीज वितरण (महावितरण) कार्यालयातही धाव घेतली. सध्या खरीप हंगाम सुरू असून पावसाने दडी मारल्याने पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. मात्र, तालुक्यातील अनेक भागांतील कृषी पंपांचे रोहित्र (डीपी) जळालेले किंवा नादुरुस्त आहेत. यामुळे पिके पाण्याअभावी डोळ्यांदेखत वाळत आहेत. त्यामुळे नादुरुस्त डीपी तत्काळ युद्धपातळीवर दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी आग्रही मागणी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
पिके वाळताहेत, डीपी तत्काळ बदला पावसाचा मोठा खंड पडल्याने पिके जगवण्यासाठी शेतकरी सिंचनाचा आधार घेत आहेत. मात्र, ऐन गरजेच्या वेळी गावागावांत डीपी (रोहित्र) जळालेल्या अवस्थेत आहेत. महावितरणने तातडीने दखल घेऊन २४ तासांच्या आत नादुरुस्त डीपी बदलून द्यावेत, अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू, असा कडक इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.