![]()
वर्धा जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 12 वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका शेतातील घरात या मुलीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडल्याने, तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतातील घरात मुलीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहता तिच्यावर घातपात झाल्याचा संशय बळावला आहे. या घटनेची माहिती पसरताच परिसरातील 3 ते 4 गावांतील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. ओळखीच्या व्यक्तीने हत्या केल्याचा संशय पीडित 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती घरी परतली, मात्र त्यावेळी घरात इतर कोणीही नसून ती एकटीच होती. घरात कोणी नसल्याची हीच संधी साधून नराधम आरोपीने घरात प्रवेश करत हे कृत्य केले. संशयित आरोपी हा पीडित कुटुंबाच्या परिचयातील किंवा जवळचाच असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण आरोपीला मुलगी दुपारी शाळेतून कधी परत येते, याची पक्की माहिती होती. दुपारच्या वेळी घरात इतर कोणीही हजर नसते आणि मुलगी पूर्णपणे एकटी असते, या वेळेचा त्याने अचूक अंदाज घेतला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी महाडीक आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्यासह वरिष्ठ पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत तपास चक्रे फिरवली आहेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी गावात रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तपासासाठी पोलिसांची पथके रवाना पीडित मुलीचे कुटुंब अत्यंत गरीब असून, शेतमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. या हत्येमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कुटुंबीयांचे जबाब नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती. मुलीवर अत्याचार झाला आहे की नाही, हे वैद्यकीय आणि न्यायवैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या नराधम आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली असून, आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Source link
वर्धा हादरले:12 वर्षीय चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह