![]()
समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भाषणाची सुरुवात केली. मंचावर उपस्थित नेते, भंतेजी, उपासक-उपासिका आणि चळवळीतील कार्यकर्त्यांना त्यांनी क्रांतिकारक ‘जय भीम’चा नारा देत संबोधित केले. जातीव्यवस्थेच्या हिंसाचारामुळे आणि संस्थात्मक हत्यांमुळे जीव गमावलेल्या शहीद रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी, विराज जगताप, नितीन आगे, सागर शेजवळ, अक्षय भालेराव, नितीन बनसोड आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचे स्मरण करत सुजात आंबेडकर यांनी व्यवस्थेवर कडाडून टीका केली. या यादीत आता आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या नावाचा समावेश झाल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थी साहिलने स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले होते; तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः त्याच्या घरी जाऊन त्याचा सत्कार केला होता. मात्र, आयआयटी मुंबई प्रशासनाने कोणत्याही पुराव्याशिवाय व चौकशीविना त्याच्यावर कॉपीचा खोटा आरोप ठेवून त्याला टार्गेट केले आणि संपूर्ण आंबेडकरी समाजाला धारेवर धरले, असा थेट आरोप त्यांनी केला. धम्म मेळाव्यात जनसमुदायाला संबोधित करताना सुजात प्रकाश आंबेडकर. आरक्षणावरून हल्ले अन् ट्रोलिंग केले जाते देशभरात विविध आंदोलनांनंतर आरक्षणाच्या विरोधात सुनियोजित मोहीम उभी करण्यात आली आहे. सोशल मीडिया, मुख्य प्रवाह आणि सर्वच पातळ्यांवर आरक्षणाचा हक्क बजावणाऱ्या विद्यार्थ्यांना व तरुणांना ‘आरक्षण छाप’, ‘भिमटे’, ‘निले कबुतर’ अशा जातीवाचक शिव्या देऊन ट्रोल केले जात आहे. जेव्हा जेव्हा आरक्षणावर आणि अधिकारांवर गदा आली, तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप किंवा ठाकरे यांपैकी कुणीही आंबेडकरी समाजाच्या बाजूने ठामपणे उभे राहिले नाही, असे ते म्हणाले.
Source link
साहिल वाकोडेची आत्महत्या नव्हे, तर ती संस्थात्मक हत्या:युवा नेते सुजात आंबेडकर यांची व्यवस्थेवर टीका