Headlines

नाबार्डचा 45 वा स्थापना दिन साजरा:महिला शेतकऱ्यांचा गौरव, महाराष्ट्रात विक्रमी ₹39,380 कोटींचे सहाय्य, ग्रामीण विकासावर भर




नाबार्डच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाचा ४५ वा स्थापना दिन गुरुवारी पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष–२०२६ च्या पार्श्वभूमीवर महिला शेतकरी, महिला-प्रवर्तित शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), स्वयं-सहाय्यता बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांचा ग्रामीण विकासातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री भरणे यांनी गेल्या ४५ वर्षांत महाराष्ट्रातील शेती, सहकार आणि ग्रामीण विकासासाठी नाबार्डने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. महिला शेतकरी हा “शेतीचा कणा” असल्याचे सांगत, त्यांनी राज्य सरकारच्या विविध शेतकरी-केंद्रित योजनांची माहिती दिली. या योजनांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन, ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांसाठी मोफत वीज, नैसर्गिक शेती अभियान, एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांना ऍग्रीस्टॅक डिजिटल ओळख, तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कृषी सल्ला देणाऱ्या ‘महाविस्तार-एआय’ आणि ‘वसुधा’ उपक्रमांचा समावेश आहे. राज्यातील प्राधान्य क्षेत्रातील कर्जपुरवठा २०२३-२४ मधील ₹६.४० लाख कोटींवरून २०२५-२६ मध्ये ₹९.२० लाख कोटींवर पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. कृषी कर्जवाटपातही लक्षणीय वाढ झाली असून, लघु व सीमांत शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्डचा विस्तार करण्याचे आवाहन त्यांनी बँकांना केले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘उमेद’ अभियानांतर्गत स्वयं-सहाय्यता गटांतील ५० लाखांहून अधिक महिलांना ₹५० हजार कोटींपेक्षा जास्त कर्जवाटप करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी नाबार्ड महाराष्ट्राचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ. ए. व्ही. भवानी शंकर यांनी २०२५-२६ हे वर्ष नाबार्डसाठी ऐतिहासिक ठरल्याचे सांगितले. व्यवसाय सहाय्य व पुनर्वित्ताची रक्कम विक्रमी ₹३९,३८० कोटींवर पोहोचली असून, राज्याच्या पायाभूत सुविधा विकासासाठी सुमारे ₹५,६०० कोटींचे सहाय्य आणि विविध विकासात्मक व अनुदानाधारित उपक्रमांसाठी ₹३७.७२ कोटींची मदत देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमास जयकिश, विवेक नचाणे, डॉ. भरत काकडे, विद्याधर अनास्कर यांच्यासह बँकिंग, सहकार आणि ग्रामीण विकास क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. महिला सक्षमीकरण, शाश्वत शेती आणि हवामान बदलाला तोंड देणाऱ्या ग्रामीण विकासासाठी नाबार्डची भूमिका अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *