![]()
तिवसा तालुक्यातील गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेतून वगळण्यात आलेल्या १२ कोरडवाहू गावांना दिलासा मिळाला आहे. या गावांकरिता स्वतंत्र उपसा जलसिंचन योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे वऱ्हा मालधुर, धोत्रा, माळेगाव, सालोरा, शेंदोळा (बु.), शिवणगावसह एकूण १२ गावांतील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यकाळात वऱ्हा येथील मुरली मदणकर आणि रवी पाथरे यांच्यासह त्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी बच्चू कडू यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना कोरडवाहू गावांकरिता स्वतंत्र योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते. सुरुवातीला या गावांचा समावेश नदीजोड प्रकल्पात करण्याचा विचार होता. मात्र, नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब लागणार असल्याने, संजय देशमुख यांनी या गावांकरिता स्वतंत्र उपसा जलसिंचन योजना मंजूर करण्याची मागणी कायम ठेवली. देशमुख यांनी शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार केला. त्यांनी तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. विधानपरिषदेच्या सदस्यांनाही पाठपुरावा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आमदार राजेश वानखडे आणि आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेतही ही मागणी मांडली. या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेमुळे कोरडवाहू परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. योजनेला मंजुरी मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांनी सिंचन विभागाचे अभियंता राजभोज यांचे आभार मानले. यावेळी भीमराव गवळी, सुरेंद्र धस्कट, नारायणराव उमक, दत्ता धस्कट, प्रवीण घोम, जितेंद्र गोस्वामी, दीपक उतखेडे, नरेंद्र काकडे, गजानन काकडे, योगेश लोखंडे, मुरली मदणकर, रवी पाथरे, ज्ञानेश्वर ढगालकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख उपस्थित होते. गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेतून वगळण्यात आलेल्या या गावातील शेतकरी अनेक वर्षांपासून सिंचनाच्या पाण्यापासून वंचित होते. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे उत्पादनात मोठी अनिश्चितता होती. या पार्श्वभूमीवर शेतकरी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी विविध आंदोलनांद्वारे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते. हा संघर्ष दशकभरापासून सुरू होता.
Source link
12 गावांना सिंचन योजनेतून पाणी मिळणार:शासनाची मंजुरी, प्रहार जनशक्तीच्या पाठपुराव्याला यश