![]()
अमरावती शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यावरून भीम ब्रिगेडने महापालिका प्रशासनावर दुटप्पी धोरणाचा आरोप केला आहे. चहा, पानटपरी आणि नाश्त्याची गाडी लावणाऱ्या लहान व्यावसायिकांवर कारवाई केली जाते, मात्र रस्त्यांच्या कडेला दुकाने थाटणाऱ्या हेल्मेट विक्रेत्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. या संदर्भात भीम ब्रिगेडने बुधवारी (२९ जुलै) मनपाचे अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांना निवेदन सादर केले आहे. संस्थेचे संस्थापक राजेश वानखडे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमरावती शहरातील मुख्य रस्त्यांवर हेल्मेट विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका अधिकारी आणि या विक्रेत्यांमध्ये काही संबंध आहेत का, असा प्रश्नही भीम ब्रिगेडने उपस्थित केला आहे. पोलिसांनी हेल्मेट सक्ती लागू केल्यापासून शहरात रस्त्यांच्या कडेला बनावट हेल्मेट विक्रीचा सुळसुळाट वाढला आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राजापेठ येथे नुकत्याच झालेल्या अपघातात दोन महिलांचा बळी गेला होता, ज्याला काही अंशी हे अतिक्रमण कारणीभूत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. तरीही मनपाचा अतिक्रमण निर्मूलन विभाग यावर गप्प का आहे, असा संतप्त सवाल संघटनेने केला आहे. भीम ब्रिगेडने प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या दोन दिवसांत रस्त्यांवरील अनधिकृत व बनावट हेल्मेट विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने कडक कारवाई न केल्यास, राजापेठ चौकात तीव्र स्वरूपाचे ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. यावेळी निवेदन देताना भीम ब्रिगेडचे संस्थापक राजेश वानखडे यांच्यासह जिल्हा सचिव ज्ञानेश्वर रंगारी, शहर कार्याध्यक्ष केवल हिवराळे, जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश जाधव, तसेच अब्दुल जावेद, अमित कुलकर्णी, शुभम राऊत, आकाश कांबळे, अजय तायडे, रोशन गवई, अजय खडसे, अंशुमन इंगळे, आदेश तेलंग, सूरज खिराडे, विशाल खंडारे, अक्षय मोरे, बाबाराव मेश्राम, प्रणय पाटील, राहुल नाईक, नितेश मोकलकर, विक्की वासनिक, प्रमोद बडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
लहान व्यावसायिकांवर कारवाई, पण हेल्मेट विक्रेत्यांवर का नाही?:भीम ब्रिगेडचा महानगरपालिकेला सवाल, आयुक्तांना निवेदन